‘हा’ अभिनेता साकारणार होता ‘कांतारा’मधील मुख्य भूमिका पण… दिग्दर्शक रिषभ शेट्टीचा खुलासा
![The 'Ha' actor was supposed to play the lead role in 'Kantara' but... director Rishabh Shetty revealed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/kantara-rishabh-shetty-lead-role-780x470.jpg)
सध्या सगळ्याच भारतीयांच्या तोंडी ‘कांतारा’ हे नाव आहे. या कन्नड चित्रपटाने केवळ भारतालाच नव्हे तर साऱ्या जगाला वेड लावलं आहे. २०० कोटी कमाई करत या चित्रपटाची यशस्वी घोडदौड अजूनही सुरूच आहे. या चित्रपटाचं लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी हा रातोरात स्टार झाला आहे. या चित्रपटामुळे जणू त्याला एक नवी ओळख मिळाली आहे. प्रत्येक मुलाखतीमध्ये त्याने या चित्रपटामागील बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत.
नुकतंच त्याने या मुलाखतीमध्ये एक नवीन गोष्ट शेअर केली आहे. ‘कांतारा’मधील शिवा ही मुख्य भूमिका सर्वप्रथम एका वेगळ्याच व्यक्तीला देण्याचा विचार रिषभने केला होता. ऐकून खरंच आश्चर्य वाटेल पण ही भूमिका सर्वप्रथम एका दुसऱ्याच अभिनेत्याकडे गेली होती, पण त्याच्या व्यस्त शेड्यूलमुळे आणि नंतर घडलेल्या अघटित घटनेमुळे ही भूमिका अखेर रिषभच्याच पदरी पडली. ‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार नुकताच एका मुलाखतीमध्ये रिषभने याचा खुलासा केला आहे.
रिषभने सांगितलं की ही भूमिका सर्वप्रथम त्याने कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार याला ऑफर केली होती. पुनीतला अप्पू या टोपण नावाने सिनेसृष्टीत ओळखतात. याविषयी व्यक्त होताना रिषभ म्हणाला, “मी जेव्हा त्याला कांताराची कथा ऐकवली तेव्हा ती त्याला प्रचंड आवडली आणि त्यात स्वतःचं योगदान असावं अशी त्याची इच्छादेखील होती, पण इतर काही महत्त्वाच्या कामामुळे तो या चित्रपटापासून दूर राहिला. एक दिवस त्याने मला फोन करून चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यास सांगितलं, शिवाय आम्ही त्याच्यासाठी थांबलो तर चित्रपट पूर्ण होणार नाही असंही त्याने स्पष्ट केलं.”
पुनीतच्या निधनाआधी एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान रिषभ आणि पुनीत पुन्हा भेटले तेव्हा पुनीतने ‘कांतारा’बद्दल चौकशी केली. याविषयी रिषभ म्हणाला, “त्याने माझ्या चित्रपटाची चौकशी केली, माझा नेमका दृष्टिकोन काय आहे तो समजून घेतला, मी त्याला चित्रपटासाठी केलेलं एक फोटोशूटही दाखवलं. ते पाहून त्याला आनंदच झाला. चित्रपट बघण्यासाठी पुनीत चांगलाच उत्सुक होता.” दुर्दैवाने गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पुनीतचं निधन झालं आणि त्यामुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हळहळली.