तुम्ही लटकेंचा राजीनामा स्वीकारताय की नाही ते सांगा, हायकोर्टाचा बीएमसी आयुक्तांना सवाल
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांच्या मुंबई महानगरपालिकेविरोधातील याचिकेवर गुरुवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना उत्तर देण्यासाठी तासाभराचा अवधी देऊ केला आहे. राजीनामा स्वीकारत आहात किंवा नाही, ते दुपारी २.३० वाजता सांगा, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले. त्यामुळे आता यावर इकलाब सिंह चहल काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दुपारी अडीच वाजता याप्रकरणाची पुढील सुनावणी होईल.
तत्पूर्वी न्यायालयात ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी जोरदार युक्तिवाद केला. रमेश लटके यांच्या निधनानंतर पक्षाच्या आदेशाने ऋतुजा लटके निवडणूक लढवत आहेत. त्यांनी २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर अशा दोन वेळेला राजीनामा दिला होता. मात्र, आता अनेक दिवस उलटूनही पालिकेने त्यावर अभिप्राय दिलेला नाही. ऋतुजा लटके यांच्याकडे पालिकेची कोणतीही थकबाकी शिल्लक नाही. तसेच नोटीस पिरीयडमधील ६७ हजार रुपयांचा पगारही लटके यांनी पालिकेकडे जमा केला आहे. ऋतुजा लटके या ज्या पदावर आहेत, त्या पदावरील कर्मचाऱ्याचा राजीनामा सहआयुक्त मंजूर करू शकतात. मात्र, हे प्रकरण पालिका आयुक्तांपर्यंत नेण्यात आले असून लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. लटके यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेल्या आहेत. तरीदेखील पालिका आयुक्तांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा यु्क्तिवाद अॅडव्होकेट विश्वजित सावंत यांच्याकडून करण्यात आला.
यावेळी ऋतुला लटके यांच्या वकिलांकडून २०१२ सालच्या एका प्रकरणाचाही दाखला देण्यात आला. हेमांगी वरळीकर यांनीही २०१२ साली निवडणूक लढवण्यासाठी अशाचप्रकारे नोकरी सोडली होती. हेमांगी वरळीकर या पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांचा राजीनामा एका महिन्याच्या आत मंजूर करण्यात आला होता. मग ऋतुजा लटके यांचा राजीनामा का स्वीकारला जात नाही, असा सवाल वकिलांकडून विचारण्यात आला.