शहरासह जिल्हाभरात कोजागरी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी
![Huge demand for milk on Kojagari Poornima across the city and district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/kojagiri-pornima-distribute-milk-780x470.jpg)
जळगाव : शहरासह जिल्हाभरात कोजागरी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी आहे. जिल्हा दूध संघातर्फे अतिरिक्त एक लाख लिटर, तर खाजगी डेअरीचालकांकडूनही अतिरिक्त लिटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा दूध संघातर्फे मागणीनुसार पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरासाठी सुमारे दीड लाख लिटर अतिरिक्त दुधाचे वितरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शहरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सुमारे तीन लाख लिटर दुधाची मागणी बाजारपेठेतून करण्यात आली होती. खाजगी डेअरीचालकांकडूनही वाढीव मागणी करण्यात आली आहे. अतुल डेअरीचे दीपक बारी यांनी, यंदा करोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर कोजागरीचे कार्यक्रम सार्वजनिकरीत्या होत आहेत. त्यामुळे सुमारे दोन-तीन हजार लिटर दुधाची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली असल्याचे सांगितले.
जिल्हा दूध संघातर्फे एक लाख लिटर दुधाची खरेदी करून त्याचे वितरण केले गेले. रोज दूध संघातर्फे अडीच लाख लिटर दुधाचे संकलन, तर दोन लाख लिटर दुधाची विक्री होत असते. विजयादशमीला शहरात दुधाचा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या वितरण विभागाकडून विशेष काळजी घेत वितरण व्यवस्थित करण्याचे नियोजन करण्यात आले. नियमित संकलनापेक्षा अतिरिक्त एक लाख लिटर खरेदी करण्यात आले आहे, असे संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी सांगितले. कोजागिरी साजरी करण्यासाठी तरुणाईही सज्ज झाली आहे. दरम्यान, पावसाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असल्याने जिल्हा दूध संघात संकलन होत असते. ऑक्टोबरपासून दूध संकलनात वाढ होत असून, जानेवारीपर्यंत तीन लाख लिटर दुधाचे संकलन केले जाण्याची शक्यता आहे.