युवक बाथरूमच्या खिडकीतून महिलेचे छायाचित्र काढत होता, मग झाले असे की…
![The youth was photographing the woman from the bathroom window, then it happened that…](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/New-Project-1-5.jpg)
नागपूर :आंघोळीसाठी गेलेल्या महिलेचे बाथरूमच्या खिडकीतून एक युवक अश्लील छायाचित्र काढत होता. हा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे पळून जाणाऱ्या युवकाला शेजाऱ्यांनी पकडले. त्याची येथेच्छ धुलाई केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना ‘एमआयडीसी’ परीसरात घडली. निखिल लक्ष्मण आदे (२०) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३१ वर्षीय महिलेसोबत आरोपीची तोंडओळख होती. निखिल हा ‘एमआयडीसी’तील एका नामांकित कंपनीत नोकरीवर आहे. मात्र, निखिलची वाईट नजर त्या महिलेवर होती. त्यामुळे तो तिचे मोबाईलने चोरून छायाचित्र काढत होता. ती महिला काम करीत असतानाही तो छायाचित्र घेत होता. ही बाब महिलेच्या लक्षात आली. तिने त्याला जाब विचारल्याने तो जपून वागत होता. शनिवारी दुपारी बारा वाजतापासून निखिल महिलेच्या घरासमोर फिरत होता.
ती महिला आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाताच त्याने खिडकीजवळ दगड लावला. दगडावर उभा होऊन महिलेचे मोबाईलद्वारे छायाचित्र काढायला लागला. मोबाईलचा उजेड पडल्याने हा प्रकार उघडकीस आला व महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे घरातून महिलेचे सासू-सासरे धावतच आले. त्यांना बघून निखिल पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याला अन्य शेजाऱ्यांच्या मदतीने पकडले आणि चांगला चोप दिला. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून निखिलला अटक केली.