मुंबईत लोकलच्या मार्गात घातपाताचा प्रयत्न
![An attempt at an assassination attempt on a local route in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/railway-track.jpg)
मुंबई | मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर लोखंडी ड्रम रुळावर टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे घातपाताचा कट उधळून लावण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. सँडहर्स्ट रोड ते भायखळा या रेल्वे स्थानकांदरम्यान दगड आणि गिट्टीने भरलेला हा लोखंडी ड्रम ठेवण्यात आला होता. या घटनेत खोपोली लोकलमधील प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे.
“सीएसएमटी स्थानकातून केपी-७ ही जलद लोकल खोपोलीच्या दिशेने १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी निघाली होती. या प्रवासादरम्यान मोटरमन अशोक शर्मा यांना भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर एक लोखंडी ड्रम आढळून आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत शर्मा यांनी वेळीच आपत्कालीन ब्रेक दाबले. मात्र, तरीही या लोकलने लोखंडी ड्रमला जोरदार धडक दिली. त्यानंतर काही अंतरावर ही ट्रेन थांबली. या घटनेदरम्यान परिसरात कर्नकर्कश आवाज झाला होता”, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली आहे. या घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांच्या मदतीने हा ड्रम रुळावरून हटवण्यात आला. या घटनेमुळे ही लोकल पाच मिनिटे उशिरा कल्याण स्थानकात पोहोचली.