बनावट मृत्यूपत्र तयार करुन जमीन बळकावण्याचा प्रकार उघड ; तिघांविरोधात गुन्हा
![Exposing the manner of grabbing land by creating fake wills; Crime against three](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/New-Project-12-2.jpg)
पुणे : जमिनीचे वारसदार हयात असताना त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार करुन जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. दिलीप नटवरलाल कोटक (रा. चिंचवड) यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी प्रतापचंद भाबूतमालजी मारवाडी (रा. साई कॉलनी, कर्वेनगर) यांच्यासह दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोटक कुटुंबियांच्या मालकीची वाघोली परिसरात जमीन आहे. आरोपींनी कोटक आणि त्यांचे नातेवाईक जिवंत असताना ते मृत झाल्याचे बनावट मृत्युपत्र प्रमाणपत्र तयार केले.
तसेच आरोपींनी स्वत: वारसदार असल्याचे भासवून दिवाणी न्यायालयातून बनावट वारस प्रमाणपत्र मिळवले. जमिनीचे कुलमुखत्यार दस्त तयार केले. त्यांनी कोटक कुटुंबियांची आणि शासनाची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.