गेल्या १० दिवसांपासून कल्याण शिळ मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्याने नागरिक हैराण
![For the last 10 days, citizens are worried about the problem of traffic congestion on the Kalyan Shil road](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/For-the-last-10-days-citizens-are-worried-about-the-problem-of-traffic-congestion-on-the-Kalyan-Shil-road.jpg)
डोंबिवली: गेल्या १० दिवसांपासून कल्याण शिळ मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्याने नागरिक हैराण झाले आहेत.आज म्हणजे बुधवारी सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी या रोडवर निर्माण झाली आहे. वाहन एकाच ठिकाणी तासंतास अडकून राहील होती. वाहनचालकांना वाहतूक कोंडीमधून बाहेर निघण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार वाहतूक प्रशासन आणि पोलिसांशी वाहतूक कोंडीत अडकलेले वाहनचालक संपर्क साधून देखील योग्य प्रतिसाद देत नसल्याने वाहनचालक हैराण झाले. अखेर मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी शक्कल लढवत ठेकेदारासह अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरच फेसबुक पोस्ट द्वारे जाहीर करून टाकले आहेत. दरम्यान काँग्रेस पदाधिकारी अमित म्हात्रे यांनी सुद्धा ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यानी ही पोस्ट व्हायरल केली आहे.
कल्याण शीळ रोड वरून प्रवास करणाऱ्या कामगार वर्गाला बुधवारी सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अनेक कामगारांना पुन्हा लेट मार्क लागणार असल्याने घरी परतण्याच्या मार्ग अवलंबला आहे. बुधवारी सकाळ पासूनच मानपाडा चौक ते रुणवाल सिटीपर्यंत दीड तासाचा वेळ यानंतर पार करण्यासाठी लागत होता. तर काटई-पलवा- कल्याण फाटा चौकापर्यंत वाहतुकीसाठी वेळ लागत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.
वारंवार शासकीय अधिकाऱ्यांचे दौरे आणि बैठका होऊन देखील वाहनचालकांना वाहतूक कोंडी मधून मुक्तता मिळत नसल्याने वाहनचालक देखील चांगलेच संतापलेले दिसून आले आहेत.अखेर मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी ठेकेदारांसह शासनाचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांचे नंबरच सोशल मीडियावर जाहीर करून टाकले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनी ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यास सुरुवात केली आहे.
रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या…
कल्याण शिळ मार्गावरून रुग्णांना मुंबई ठाण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या होत्या. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांसह रुग्णांचे नातेवाईक देखील प्रचंड संतापले आहेत.
शिळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम संथ आणि निकृष्ट दर्जाचे…
या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. ठेकेदाराकडून हे काम संथ गतीने करत असल्याने वाहनचालकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच रस्त्यावर खड्डे, क्रॅक पडलेले दिसतात.मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठवला. मात्र अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत.
ट्रॅफिक वॉर्डन हे ट्रॅफिक नियोजन न करता वसुलीचे काम करताना अनेक वेळेला दिसत आहेत.वाहतूक पोलिसांना योग्य मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्यांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डन दिले आहेत.मात्र हे ट्रॅफिक वॉर्डन वाहतुकीचे नियोजन न करता वसुलीचे काम करताना अनेक वेळेला दिसत आहेत.
वाहनचालकांचा देखील बेशिस्त पणा…
वाहतूक पोलिसांनी वाहनांची रांग थांबवल्यास वाहनचालक चुकीच्या मार्गिकेतून वाहन हाकत आहेत. एकाच मार्गिकेतूजन दोन दोन लेन सुरू होत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. वाहतूक कोंडीला सामोरे जाणाऱ्या अन्य शिस्तप्रिय वाहनचालकांना देखील याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. .
कल्याण शीळ रोडचा आतापर्यंतचा खर्च
दरम्यान २००६ साली -५० कोटी , २०१७ -३९० कोटी, २०१९ -७७३ कोटी, २०२२ -१२०० कोटी मंजूर झालेला असून त्यावर खर्च देखील सुरु आहे. मात्र हा पैसा जातोय कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचालकांचा शासनाच्या वाढत्या आकडेवाडीनुसार वेळ आणि इंधन देखील खर्च होत आहे. मात्र शासनयाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र वाहतूक कोंडी मधून दिसून येतं आहे.