कोल्हापुरातील शाहूवाडी येथील पालेश्वर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात १ तरुण बुडून बेपत्ता
![1 youth drowned in water falling from spillway of Paleshwar Small Irrigation Project at Shahuwadi in Kolhapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/1-youth-drowned-in-water-falling-from-spillway-of-Paleshwar-Small-Irrigation-Project-at-Shahuwadi-in-Kolhapur.jpg)
कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूवाडी येथील पालेश्वर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात १ तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. राजेश बाबुराव पाटील (वय ३५, रा. लाटवडे, ता. हातकणंगले) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. दरम्यान, शाहू वाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद कोळपे यांनी पोलीस पथकासह ( Kolhapur News Today ) घटनास्थळी भेट देऊन बेपत्ता तरुणाच्या मित्रांकडून घटनेची माहिती घेतली यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या जीवनरक्षक रेस्क्यू फोर्सची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.
सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. अंधार होत असल्याने आणि पाण्याला प्रवाह मोठ्या प्रमाणत असल्याने शोधमोहीम राबविण्यात अडथळे येत होते. दरम्यान जीवनरक्षक रेस्क्यू टीमने मंगळवारी दुपारी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. मात्र, बुडून बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्यात अद्याप यश आलेलं नाही.
लाटवडे (ता. हातकणंगले) येथील राजेश पाटील याच्यासह ९ मित्र मिळून सोमवारी ( दि. १५) दुपारी १२.३० च्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील माण पालेश्वर डॅम पाहण्यासाठी आले होते. धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात आलेले पाणी पाहण्यासाठी सर्वजण गेले होते. यावेळी पाण्यात उतरलेला राजेश पाटील या युवकाला प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तो बेपत्ता झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, माहिती मिळताच पोलीस आणि जीवरक्षक रेस्क्यू जवानांनी बेपत्ता युवकाचा घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू फोर्सच्या वतीने मंगळवारी दुपारनंतर पुन्हा शोध कार्य सुरू ठेवले. शाहूवाडी पोलीस पथक यांच्यासह स्थानिक नागरिक घटनास्थळी बेपत्ता युवकाचा शोध घेत आहेत.