जेव्हा खातेवाटप होईल तेव्हा तुमची काय अवस्था होईल? विखे पाटलांचा थोरातांना खोचक सवाल
![जेव्हा खातेवाटप होईल तेव्हा तुमची काय अवस्था होईल? विखे पाटलांचा थोरातांना खोचक सवाल](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/जेव्हा-खातेवाटप-होईल-तेव्हा-तुमची-काय-अवस्था-होईल-विखे-पाटलांचा.jpg)
अहमदनगर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नगर जिल्ह्यात पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. बिनखात्याचे मंत्री असं म्हणत टीका करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘महाविकास आघाडी सरकारमध्ये नगर जिल्ह्यात तीन मंत्री असताना त्यांनी कोणता प्रकल्प जिल्ह्यात आणला? केवळ वाळू उपसायची, हा एकच उद्योग नगर जिल्ह्यात सुरू होता. आता सत्ता गेल्याने जलबिना मछली अशी अवस्था झाल्याने ते तडफडत आहेत. आपल्या जिल्ह्यातील एक वरिष्ठ मंत्री होते, ते आमच्यावर बिनखात्याचे मंत्री झेंडावंदन करणार असल्याची टीका करत आहेत. मात्र त्यांनी आमची चिंता करू नये. ज्यावेळी खातेवाटप होईल त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचा पहिल्यांदा विचार करा,’ अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता विखे पाटलांच्या हातात?
मोठ्या प्रतिक्षेनंतर काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र विस्तार होऊनही अद्याप खाते वाटपाची प्रतीक्षा कायम आहे. १७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी खातेवाटप होण्याची चिन्हे असून कोणाला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी सर्वात प्रथम शपथ घेण्याचा मान मिळाल्याने भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना महत्वाचे असे महसूल किंवा सहकार खाते मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता विखे पाटलांना मिळणार असल्याचे वक्तव्य भाजप नेते पाशा पटेल यांनी केलं आहे. त्यामुळे पटेल यांच्या वक्तव्याचा नेमका ‘अर्थ’ काय? याबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. विखे पाटलांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांच्या लोणी गावात भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना पाशा पटेल यांनी विखे पाटलांच्या मंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.