दैनंदिन काम जे डाव्या हाताने करतात त्यांना डावखुरे म्हणतात, डावखुऱ्यांचा दिवस, देशातील ‘या’ लेफ्टी व्यक्तींनी डाव्यांची मान उंचावली
![Those who do daily work with their left hand are called left-handed, left-handed day, 'these' lefties in the country celebrate left-handedness.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Those-who-do-daily-work-with-their-left-hand-are-called-left-handed-left-handed-day-these-lefties-in-the-country-celebrate-left-handedness..jpg)
नागपूर: दैनंदिन काम जे डाव्या हाताने करतात त्यांना डावखुरे म्हणतात. आपल्याकडे डाव्या हाताच्या वापरावर अनेक ठिकाणी आक्षेप आहे. याशिवाय दैनंदिन वापराच्या विविध वस्तू उजव्यांनाच डोळ्यासमोर ठेवून तयार केल्या जातात. त्यामुळे डावखुऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
एखादी व्यक्ती डावखुरीच का होते, याबाबत विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. धार्मिक कार्यात डाव्या हाताचा वापर अशुभ समजला जातो. डावखुरी व्यक्ती डाव्या हाताने जेवत असेल तर बरेच वेळा त्यांना रोखले जाते. छोट्या मोठ्या कामासाठी उपयोगी पडणारी कात्री असो किंवा इतर वस्तू त्या वापरतानाही डाव्या हाताने वापरता येत नाही. पैश्यांचा व्यवहार करताना डाव्या हाताने पैश्यांची देवाण घेवाण करू नये असेही सांगितले जाते. वारंवार टोकल्यामुळे काहींच्या मनात न्यूनगंडही निर्माण होतो. त्यामुळे डावखुऱ्या व्यक्तींना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत बी.कॉम.चा विद्यार्थी विशाल सादमवार म्हणाला, ‘डाव्या हाताचा वापर केल्यास अनेक वेळा अशुभ घटना घडेल असे सांगितले जाते. त्यामुळे प्रत्येक काम उजव्या हातानेच करण्यासाठी अनेक जण सांगतात.’ ‘लहाणपणी डाव्या हातानेच जेवणाची सवय होती. मात्र शाळेतील शिक्षकांनी डाव्या हाताने जेवू नये अशी ताकीद दिल्याने ती सवय मोडावी लागली. मात्र डावखुऱ्यांना सर्व कामे डाव्या हातानीच करू दिले पाहिजे’ असे मत कुणाल चौधरी यांनी मांडले. डावखुरा असणे हे देखील नैसर्गिक आहे, असे वैभवी क्षीरसागर म्हणाली. ‘डावखुरे असल्याने अडचणी येतात. मात्र जगात फार कमी लोक डावखुरे आहेत. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना अत्यंत आनंददायी आहे,’ असे साक्षी राऊत हिने स्पष्ट केले.
मेंदूचा डावा भाग अधिक कार्यक्षम
डावखुरा असण्याचा संबंध मेंदूशी आहे. यावर जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र सामान्यत: डावखुऱ्या व्यक्तींच्या मेंदूचा डावा भाग अधिक कार्यक्षम असतो. काही प्रमाणात अनुवांशिकतेमुळेही एखादी व्यक्ती डावखुरी राहू शकते अशी माहिती मेंदुरोग तज्ज्ञ डॉ. ललित महाजन यांनी दिली.
भारतातील प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्ती
राष्ट्रपिता महात्मा गांधी, उद्योगपती रतन टाटा, सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते अमिताभ बच्चन, गायिका आशा भोसले, क्रिकेटपटू युवराज सिंग.