उद्धव ठाकरेंकडून नितीश कुमारांचं तोंडभर कौतुक
![बिहारमधील सत्तांतराचे 'सेना भवना'वर पडसाद, उद्धव ठाकरेंकडून नितीश कुमारांचं तोंडभर कौतुक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/बिहारमधील-सत्तांतराचे-सेना-भवनावर-पडसाद-उद्धव-ठाकरेंकडून-नितीश-कुमारांचं-तोंडभर.jpg)
मुंबई : महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
बिहारमध्ये झालेल्या सत्तांतराचे ‘शिवसेना भवना’वर पडसाद उमटले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचे ठाकरेंनी कौतुक केले. विरोधी पक्षांच्या आधी मित्रपक्षांना संपवणं हे भाजपचं धोरण आहे, २०१९ मध्येच आपल्याला भाजपचं धोरण समजलं होतं, म्हणून आपण भाजपपासून वेगळे झालो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत नितीश यांनी पुनरागमन केले. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. बिहारमध्ये जनता दल (संयुक्त)-भाजप युती सरकार कोसळल्यानंतर जनता दल (संयुक्त)-राजद-काँग्रेस या पक्षांचे महागठबंधन सरकार सत्तेवर आले आहे. मंगळवारी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन एनडीएसोबत काडीमोड घेतला होता. त्यानंतर लगेच राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडीची घोषणा करण्यात आली होती. याचा उल्लेखही उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात माजी नगरसेवकांशी बातचित केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार निवडून येणार नाहीत. महापालिका निवडणुकीत आपलाच भगवा फडकणार, गेल्या निवडणुकीत आपण भाजपविरोधात लढलो होतो आणि जिंकलो होतो, याही वेळी आपण लढून जिंकू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
प्रत्येकाने आपापल्या विभागात काम करा, वॉर्डमध्ये फिरा, लोकांच्या संपर्कात राहा, त्यांची कामं करा, कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी दिला. वॉर्ड पुनर्ररचना झाल्याने आरक्षण पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. २०१७ च्या वॉर्ड रचनेला आपला आक्षेप असून कोर्टात जाणार असल्याच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.