पुण्यातील वादग्रस्त पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल, बंद खोलीत नागरिकांना बेदम मारहाण
![बंद खोलीत नागरिकांना बेदम मारहाण, पुण्यातील वादग्रस्त पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/बंद-खोलीत-नागरिकांना-बेदम-मारहाण-पुण्यातील-वादग्रस्त-पोलिसाचा-व्हिडिओ-व्हायरल.jpg)
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पुण्यातील उरुळी कांचन येथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गरीब हमालाला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करत असल्याचा प्रकार व्हिडिओ समोर आला. या प्रकरणाने पोलिस वादात आले असताना आता पुण्यातील पोलिस अधिकाऱ्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे कारवाई करत काही नागरिकांना बंद खोलीत मारहाण करत असल्याचा प्रकार व्हिडिओमधून व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पुराणिक हे मारहाणीसह शिवीगाळही करत आहेत. आता या प्रकरणी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसंच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता गप्प का? असा सवाल केला जात आहे. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या विरोधात अनेक लोकांनी पोलिसा आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. वादग्रस्त असलेले राजेश पुराणिक हे सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहेत. पुराणिक यांच्याविरोधात वेळोवेळी तक्रार करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना पाठीशी का घालत आहेत? असा सवाल केला जात आहे.
पोलिसांनीच घेतला कायदा हातात
राजेश पुराणिक यांनी एक महिन्यापूर्वी वॉटर बारमध्ये कारवाई केली होती. जेवणासाठी आलेल्या महिला आणि मुलींना मारहाण केली होती. त्यानंतर आता राजेश पुराणिक यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नागरिकांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या राजेश पुराणिक यांना कोण पाठीशी घालतंय? असे प्रश्न पुणे पोलिसांना उद्देशून उपस्थित करण्यात येत आहेत.