शिंदे समर्थक आमदाराचा बड्डे, जयघोष राष्ट्रवादीच्या आमदाराचा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Shinde-Gat-Mla.jpg)
शिंदे गटातील आमदाराचा बड्डे, घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्याची, कार्यकर्त्याची अनोखी निष्ठा
कार्यकर्त्यांची अनोखी निष्ठा
सातारा । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
सातारा : एरव्ही नेत्याने पक्ष बदलला की कार्यकर्त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. साहेबांचा नवा पक्ष, नवे नेते, सोबतीला नेते कार्यकर्ते, नव्या घोषणा अशी सगळी तयारी कार्यकर्त्यांना करावी लागते. मात्र साताऱ्यात एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी पक्ष बदलल्याने नेत्याची कशी फजिती झाली, हे दिसून आलं. त्याचं झालं असं की…. एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या आमदाराच्या नावाने घोषणा दिली गेली. कार्यकर्ता आधी राष्ट्रवादीत होता. पण काहीच दिवसांपूर्वी त्याने महेश शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. जुन्या नेत्याचा जयजयकार आणि त्यांच्याविषयी मनात असलेली आपुलकी आणखीही गेली नव्हती. कार्यकर्त्याच्या अनोख्या निष्ठेची साताऱ्यासह राज्यात एकच चर्चा होतीये.
नेमकं काय घडलं…?
कोरेगाव मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातच आमदार शिंदे यांची ग्रंथतुला करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साहेबांच्या बड्डेला सगळेच कार्यकर्ते उत्साहात होते. याचवेळी एका उत्साही कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष केला, त्यांच्या नावाची घोषणा दिली. शिवसेना आमदाराच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नावाने घोषणाबाजी झाल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सगळेच कावरे बावरे झाले. सेना आमदार शिंदे तर बुचकाळ्यातच पडले. थोड्यावेळ नेमकं काय झालं, हेच कळायला मार्ग नव्हता.
पण असं नेमकं का घडलं…??
शशिकांत शिंदे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केलाय. मात्र अजूनही त्यांच्या तोंडात शशिकांत शिंदे यांचंच नाव आहे. त्याचमुळे शशिकांत शिंदेंचं नाव अनावधानाने ग्रंथतुला कार्यक्रमात घेतलं गेलं. मात्र झालेली चूक दुरुस्त करुन कार्यकर्त्याने पुन्हा आमदार महेश शिंदे यांच्या नावाची घोषणा दिली. परंतु कार्यकर्त्याकडून झालेली चूक आमदार महेश शिंदे यांनीसुद्धा खेळकरपणाने घेत मिश्किलपणे थोडावेळ कार्यकर्त्याकडे पाहिलं.
साताऱ्यात व्हिडीओ तुफान व्हायरल
कार्यकर्त्यामुळे झालेली फजिती, जुन्या नेत्याविषयी असलेली निष्ठा, अनावधानाने झालेली चूक आणि आमदार साहेबांनी देखील खेळकरपणाने सगळा प्रसंग पाहून, हास्यविनोदात घेतलेला सहभाग…. असा हा मजेशीर प्रसंगाचा व्हिडीओ साताऱ्यासह राज्यभरात तुफान व्हायरल होतोय.