तुमच्या आसपास अपंग राहतात, चला त्यांना मदत करूया; आमदार लक्ष्मण जगताप यांचे आवाहन
![Disabled people live around you, let's help them; MLA Laxman Jagtap's appeal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/-आसपास-अपंग-राहतात-चला-त्यांना-मदत-करूया-आमदार-लक्ष्मण-e1658850194226.jpg)
पिंपरी : तुमच्या शेजारी किंवा आसपास अपंग राहत असतील तर त्यांना पुन्हा जिद्दीने उभे करण्यासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी हात मदतीचा पुढे केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवारी (२९ जुलै रोजी) अपंगांसाठी कृत्रिम हात व पाय (जयपूर फूट) मोफत बसवण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. चला तर मग तुमच्या शेजारी किंवा आसपास राहणाऱ्या अपंगांपर्यंत या शिबीराची माहिती पोहोचवून आपल्या सहकार्याची एक कुबडी त्यांना देऊ या. कदाचित याच कुबड्या खचलेल्या अनेक अपंगांच्या जीवनाला आधार देतील, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
अपंग! शब्द फक्त तीन अक्षरी. उच्चारण्यासाठी किती सहज सोपा. पण तितकाच या अपंगत्वाचा अनुभव घेणे कठीण व दु:खद. काहीजण जन्मत:च अपंग असतात तर काही अपघाताने अपंग होतात. पण संबंध थेट अपंगत्वाशीच! कधी कधी त्या विकलांग जीवाला समाजाचा अपमान, अवहेलना सहन करावी लागते. या अवहेलनेत काही अपंग खचतात. पण अशातही काहीजण जिद्दीने पुढे जातात. हाताने, पायाने अपंग दिसणारी माणसे मनाने कधीच अपंग नसतात. अपंग असतो तो फक्त त्याची अवहेलना करणारा धडधाकट माणूस.
खरं तर खरा आत्मविश्वास, खरी चिकाटी व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ही एखाद्या धडधाकट व्यक्तीपेक्षा एखाद्या अपंगातच जास्त असते. प्रत्येक विकलांग जीवामध्ये आत्मविश्वास असतो. पण त्याला गरज असते, ती फक्त आपल्या सहकार्याची. पाठीवर शाबासकीने, प्रेमाने थाप मारणाऱ्या हाताची. जर लोकांनी एकजुटीने त्यांना मदतीचा हात दिला तर मग आपण खांद्याला खांदा लावून त्यांच्या समवेत प्रगतीपथावर मार्गक्रमण करू.
त्यासाठीच भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने अपंगांना मदतीचा हात दिला जाणार आहे. अपंगांना कृत्रिम हात व पाय (जयपूर फूट) मोफत बसवण्यासाठी शुक्रवार २९ जुलै रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील संपर्क कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबीर होणार आहे. चला तर मग तुमच्या शेजारी किंवा आसपास अपंग राहत असल्यास त्यांच्यापर्यंत या शिबाराची माहिती पोहोचवूया, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.