एमपीएससी मुख्यालयासाठी कायमस्वरुपी जागा मंजूर
- विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: साडेपाच हजार चौरस मीटरमध्ये होणार प्रशस्त कार्यालय
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला हक्काचे कार्यालय मिळावे या विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. आयोगासाठी शासनाने बेलापूर येथे कायमस्वरुपी पाच हजार पाचशे चौरस मीटर जागा कायमस्वरुपी उपलब्ध करुन दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने याबाबचा शासन निर्णय बुधवारी काढण्यात आला. यानंतर ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाम आतापर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चालविले जात आहे. आयोगाचे काम हे संवेदनशील व गोपनीय असल्याने आयोगाचे सर्व कामकाज एकाच ठिकाणी चालावे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एका कामासाठी तीन वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी द्याव्या लागू नये म्हणूनही या सर्व इमारतींमध्ये चालणाऱ्या कामकाजाचे एकत्रिकरण व्हावे अशी मागणी राज्यातील स्पर्धा परीक्षांर्थींनी केली होती. शासनाने अखेर ही मागणी मान्य करत नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर येथे आयोगाला जागा देण्याचे मंजूर केले आहे.
याबाबतच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, सीबीडी बेलापूर येथील सिकडो मुंबईचा दहा हजार चौरस मीटरचा भूखंड सार्वजनिक बांधकाम खात्याकडे 1984 मध्ये भाडेतत्त्वावर हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यापैकी 2 हजार चौ.मी.जागा मेट्रो प्रकल्पासाठी तात्त्पुरत्या स्वरुपात देण्यात आली आहे. उर्वरित आठ हजार चौ.मी.जागेपैकी 5 हजार 500 चौ.मी. जागा आयोगाच्या कार्यालयासाठी देण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांनी याचे स्वागत केले असून आता विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार असून आयोगाच्या कामात सुसुत्रता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.