499 शहीद पोलिसांच्या मदतीसाठी मोहीम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/jammu-police-69.jpg)
श्रीनगर – जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 499 विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी राज्याच्या पोलिस विभागाने लोकांकडून निधी मिळवण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक एस.पी. वैद यांनी या क्राऊड फंडींग योजनेची सोशलमिडीयाच्या माध्यमातून सुरूवात केली. त्यांनी या संबंधात केलेल्या आवाहनात म्हटले की काश्मीरात दहशतवाद्यांशी आणि फुटीरवाद्यांशी लढताना 499 विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे पोरक्या झालेल्या त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी लोकांनी उदारपणे दान करावे.
या निधीद्वारे आपण या शहीदांच्या परिवाराला मदत केल्याची छोटी जबाबदारी उचलू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. त्यातून त्या परिवारातील मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या परिवाराच्या पालन पोषणाचे काम करता येणार आहे. सध्या राज्याच्या पोलिस दलातील 31 हजार विशेष पोलिस कर्मचारी अन्य सुरक्षा जवानांच्या खांद्याला खांदा लाऊन देशाच्या हिताचे काम काश्मीरात करीत आहेत.
या विशेष पोलिस अधिकाऱ्यांना सध्या केवळ सहा हजार रूपये मानधनावर काम करावे लागत आहे. खेड्यांमध्ये गावच्या रक्षणासाठी नेमलेल्या समितीतील 131 सदस्यही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडले आहेत. त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठीही लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.