गटनेते पदावरुन हकालपट्टी केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज; शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर!
![Eknath Shinde angry over expulsion of group leader; Shiv Sena on the brink of collapse!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/राज्यपालांची-भेट-घेऊन-आज-दुपारी-भाजप-समर्थनाचं-पत्र-देणार-एकनाथ.jpg)
मुंबई : शिवसेनेच्या अर्ध्याहून अधिक आमदारांनी मंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात बंडाचा झेंडा फडकावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी या बंडखोर गटाची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे हे नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपला समर्थन देत असल्याचं पत्र देतील, अशी चर्चा रंगत होती. मात्र स्वत: एकनाथ शिंदे यांनी चर्चा फेटाळून लावली आहे.
‘शिवसेना सोडण्याचा किंवा राज्यपालांची भेट घेण्याचा अद्याप आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे ४० पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आले आहेत. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही,’ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना गटनेतेपदावरून दूर करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतल्याने एकनाथ शिंदे हे दुखावले गेले असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी शिवसेना सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसताना मला गटनेतेपदावरून दूर का केलं, असा सवाल शिंदे यांनी केला आहे.