पुणे – स्टेशन मास्टरांचे देशव्यापी उपोषण
देशभरातील 35 हजार कर्मचारी सहभागी होणार
– पुणे विभागातील 370 जणांचा समावेश
पुणे – आपल्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशन संघटनेने दि. 11 ऑगस्ट रोजी देशभर एकाच दिवशी एकदिवसीय उपोषणाचा इशारा दिला आहे.
रेल्वेच्या कुठल्याही कामाला अडथळा न आणता हे उपोषण करण्यात येणार आहे. या माध्यामतूनच प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे, अशी माहिती असोशिएशनचे धनंजय चंद्रात्रय यांनी दिली.
देशातील 35 हजार स्टेशन मास्टर या उपोषणात सहभागी होणार असून यामध्ये पुणे विभागातील 370 स्टेशन मास्टरांचा समावेश आहे. स्टेशन मास्टर हा भारतीय रेल्वेचा कणा असून त्याला रेल्वेचा ब्रॅंड अम्बेसिडर असे समजले जाते. रेल्वेच्या वाहतुकीत तथा इतर सर्व विभागात काम करणाऱ्यांचा तो दुवा असतो. मात्र, प्रशासनाकडून स्टेशन मास्टर कॅडरला नेहमीच दुर्लक्षित ठेवले जाते, असा आरोप करण्यात आला आहे. एमएसीपीच्या माध्यमातून मिळणारी बढती (ग्रेड-पे) देण्यात यावी, देशभरात अनेक ठिकाणी 12 तास ड्युटी करावी लागते, असे रोस्टर रद्द करण्यात यावे. ड्युटी संपलेल्यांसाठी (ज्यांना घरी जाण्यासाठी सुविधा नाही) त्यांना स्टेशनवर निवासाची व्यवस्था करावी, प्रशासनाने तयार केलेले स्टेशन डायरेक्टर हे पद अनुभवी व वरिष्ठ स्टेशन मास्तरांना देण्यात यावे. नवीन पेंशन योजनेला होणारा विरोध पाहता ती तातडीने रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी आदी मागण्या असोशिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
————————-





