हमखास मिळणार शुक्रवार आणि सोमवारी जागेवर अधिकारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pune-municipal-corporation.jpg)
पुणे – जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नागरिक दररोज कामानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येत असतात. परंतु, अधिकारी जाग्यावर नसल्यामुळे नागरिकांना हताश होवून घरी जावे लागते आणि कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात.
नागरिकांची ही पायपीट थांबावी आणि अधिकारी उपलब्ध व्हावेत यासाठी दर सोमवारी आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी मुख्यालत थांबावे अशा सूचना अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामध्ये ग्रामपंचायत, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाकडे नागरिकांची अनेक कामे असतात. त्यातच एखाद्या कामाचा पाठपुरावा करायचे म्हटले तर नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणाहून शहरात यावे लागते.
एक ते दोन तास प्रवास करून मुख्यालयात आल्यावर अधिकारीच जागेवर नसल्यास समजताच नागरिक निराश होतात. कर्मचाऱ्यांकडून “या उद्या’ असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांसमोर कोणताच पर्याय उपलब्ध राहत नाही आणि संपूर्ण दिवस प्रवासामध्ये जातो. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकाचे काम लवकरात लवकर व्हावे, त्यांना अधिकारी उपलब्ध असावेत यासाठी अध्यक्षांनी ठोस भूमिका घेत, दर आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुुख्यालयातच थांबावे असे आदेश दिले आहेत.
तसेच पंचायत समिती, ग्रामपंचायत येथील अधिकाऱ्यांनीही तालुक्याच्या ठिकाणी थांबावे, मुख्यालय सोडून जावे नये आणि नागरिकांना कामांना प्राधान्य द्यावे असे देवकाते यांनी सांगितले.