‘धरण उशाला अनं कोरड घशाला’ पिंपरी-चिंचवडची अवस्था
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/panni.jpg)
- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा संताप
- अधिका-यांना कोंडून कार्यालयाला ठोकले टाळे
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘धरण उशाला अनं कोरड घशाला’ अशी अवस्था सध्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहराची झाली आहे. ऐन पावसाळ्यात शहरातील अनेक भागात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या नगरसेवकांनी आज शुक्रवारी (दि. 3) पाणी पुरवठा अधिका-यांना जाब विचारत त्यांना कार्यालयात कोंडून दरवाजाला टाळे लावले. पंधरा दिवसात पुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण जवळपास 96 टक्के भरले आहे. पावसाळा सुरु आहे. तरीही, महापालिका पाणी पुरवठा अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे शहरातील अनेक भागातला पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे यांच्या कार्यालयाला टाळे लावले होते.
पिंपरी, चिंचवड, तळवडे, रुपीनगर, चिखली, रावेत या परिसरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. धरणात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, समीर मासूळकर, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, मयुर कलाटे, पोर्णिमा सोनवणे, विनया तापकीर, सुलक्षणा धर, गीता मंचरकर सहभागी झाले होते.