सशांची शिकार करणारे पोलिसांच्या सापळ्यात अडकले, ५ जणांना अटक
![सांगली: सशांची शिकार करणारे पोलिसांच्या सापळ्यात अडकले, ५ जणांना अटक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/सांगली-सशांची-शिकार-करणारे-पोलिसांच्या-सापळ्यात-अडकले-५-जणांना-अटक.jpg)
सांगली: वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या एका टोळीला चांदोलीच्या वन विभागाने शिराळ्याचा खोतवाडी येथून जेरबंद केले आहे. पिसोरा (गेळा) आणि ससे या प्राण्यांची शिकार केल्यानंतर पसार होणाऱ्या ५ जणांना वन विभागाने अटक केली आहे. तर, २ जण पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. या टोळीकडून चार मृत प्राण्यांसह ३ बंदुक आणि १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
शिकारीसाठी शिराळा तालुक्यातील खोतवाडी येथील मांडलाई पठार परिसरात आलेल्या शिकाऱ्यांच्या टोळीला वनविभागाच्या पथकाने पकडले आहे. तर, यावेळी दोघेजण फरारी झाले आहेत. यावेळी त्यांच्याकडून शिकार केलेली दोन पिसोरा, दोन ससे हे चार मृत प्राणी, ३ बंदुका आणि १३ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवीण बोरगे, बाजीराव बोरगे, मारुती वरे, संजय भोसले आणि रामचंद्र बोरगे (सर्व राहणार शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
मांडलाई पठार परिसरात काहीजण शिकारीसाठी गेल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, मांडलाई पठारावर खोतवाडी ते कुंभारवाडी दरम्यान पाळत ठेवली. रात्रीच्या सुमारस शिकाऱ्यांनी २ पिसोरे आणि २ सशांची बंदुकीचने शिकार केली. बंदुकीचा आवाज येताच वन विभागाच्या पथकाने गतीने शोध घेऊन शिकारी टोळीवर झडप टाकली. यावेळी त्यांच्या हाताला ५ शिकारी लागले. तर २ जण फरार होण्यात यशस्वी ठरले.