सीएनजी भरण्यासाठी आलेल्या रीक्षा चालकाला कार चालकाकडून मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/CRIME-4.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी आलेल्या रिक्षा चालकाला एका कार चालकाने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी पावणे तीन वाजता आदर्शनगर मोशी येथील काजळे पेट्रोल पंपावर घडली.
यशवंत बाळू अगाळणे (वय 50, रा. मोशी गावठाण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 14 / एच के 7588 क्रमांकाच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी दुपारी काजळे पेट्रोल पंपावर त्यांच्या रिक्षात सीएनजी भरण्यासाठी गेले होते. त्यांचा रिक्षा त्यांनी सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभा केला. दरम्यान त्यांच्या मागून आरोपी कार चालक कार घेऊन आला. त्याने फिर्यादी यांना रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. मात्र फिर्यादी यांनी ‘माझी रिक्षा नंबरला असल्याचे आरोपीला सांगितले. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना हाताने मारहाण करून डीझेल सोडण्याच्या मशीनवर ढकलून देत हयगयीची कृती केली. यात फिर्यादी जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.