मान्सून आगमनाची तारीख बदलली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार; जाणून घ्या…
![Monsoon arrival date changed; When to enter Maharashtra; Find out ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Monsoon-arrival-date-changed-When-to-enter-Maharashtra-Find-out-....jpg)
पुणे |‘हवामान अनुकूल होत असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होऊ शकते’, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी जाहीर केले. मात्र, मान्सूनचा त्यापुढील प्रवास संथपणे होण्याची शक्यता आयएमडीच्या विस्तारीत अंदाजातून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारण तारखेच्या आसपास म्हणजे ७ ते १० जूनच्या दरम्यान मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते, असे वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.
हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केरळच्या उत्तरेकडील भागांत सर्वदूर पावसाची शक्यता नसून, महाराष्ट्रात सर्वसाधारण तारखेच्या आधी मोसमी पावसाची शक्यता कमी आहे. यावर्षी मान्सून २७ मे रोजी म्हणजे सर्वसाधारण तारखेपेक्षा पाच दिवस आधी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. मात्र, मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे आयएमडीने स्पष्ट केले.
आयएमडीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, ‘दक्षिण अरबी समुद्रात जमिनीलगत पश्चिमेकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढत असून, त्यांची उंचीही वाढताना दिसत आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या क्षेत्रात ढगांची गर्दीही दिसून येत आहे. केरळसोबत लक्षद्वीप लगतच्या क्षेत्रातही पुढील काही दिवसांत मान्सून प्रगती करू शकेल.’
मात्र, आयएमडीच्या चार आठवड्यांच्या विस्तारित अंदाजानुसार, ७ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा पश्चिम-नैऋत्येकडून होण्याची शक्यता असून, २६ मे ते ८ जून या कालावधीत केरळपासून महाराष्ट्रापर्यंतच्या किनारपट्टीवर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या शुक्रवारच्या अंदाजात म्हटल्याप्रमाणे केरळमध्ये मान्सूनचे आगमन जाहीर झाले, तरी त्यापुढे मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान पोषक नसेल. दरम्यान, दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह मालदीव, तसेच लक्षद्वीप बेटांलगतच्या काही भागांत मान्सूनने शुक्रवारी प्रवेश केल्याचे आयएमडीने जाहीर केले.
काही भागांत पावसाचा अंदाज
येत्या काही दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्च्चेरी आणि कराईकल या भागात अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. उत्तरेकडे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही येत्या चार दिवसांत पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, उत्तर पंजाब, उत्तर हरयाणा, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान येथे दोन-तीन दिवसांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य आणि ईशान्य भारतात दोन-तीन दिवस कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी अधिक असेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
गडचिरोलीत घुमले वादळीवारे; क्षणात होत्याचं नव्हतं झालं