मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम; दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक
![15 days ultimatum for Mumbaikars; Helmets are also mandatory for the person sitting on the back of the bike](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/मुंबईकरांना-१५-दिवसांचा-अल्टिमेटम-दुचाकीवर-मागे-बसलेल्या-व्यक्तीलाही-हेल्मेट-बंधनकारक.jpg)
मुंबईः मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही आता हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आज हे आदेश काढले आहेत. १५ दिवसांनी याबाबत कारवाई सुरू होणार असल्याचं पोलिसांनी या आदेशात म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांनी आज हे आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, मुंबई शहरामध्ये अनेक दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. तसंच, दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्तीही हेल्मेटच वापर करत नाही. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीला मोटर वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच वाहतूक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत करण्याची तरतूद आहे, असं मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.
दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांना हेल्मेट वापरावे अन्यथा येत्या १५ दिवसांनंतर अशा दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसाचे आदेशपत्र
दरम्यान, वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळं मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर पाऊलं उचलली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच एका स्कुटीवरुन एक दोन नव्हे तर चक्का सहा जणांनी प्रवास केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कहर म्हणजे, स्कुटीवर सर्वात मागे बसलेल्या तरुणाच्या खांद्यावर एक तरुण खांद्यावर बसल्याचं दिसतं आहे. अंधेरी पश्चिम येथील स्टार बाझारजवळ हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे.