पुण्यात निवडणूक तयारीला वेग; मतदानासाठीच्या बूथ संख्येत ४ हजारांपर्यंत वाढ होणार
![Speed up election preparations in Pune; The number of polling booths will increase to 4,000](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/पुण्यात-निवडणूक-तयारीला-वेग-मतदानासाठीच्या-बूथ-संख्येत-४-हजारांपर्यंत-वाढ.jpg)
पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमुळे महापालिका निवडणुकीस मतदानासाठीच्या बूथ संख्येत चार हजारांपर्यंत वाढ होणार आहे. या निवडणुकीसाठी किमान २२ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची आवश्यकता भासणार असून, त्यासाठीची जुळवाजुळव महापालिकेने सुरू केली आहे. (Pune Muncipal Corporation Election)
महापालिकेच्या निवडणूक शाखेचे प्रमुख यशवंत माने यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी बुधवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे प्रमुख; तसेच इंजिनीअर्सची बैठक घेतली. यामध्ये मतदारयाद्या फोडणे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी कार्यालये, स्ट्राँगरूम, मतदान केंद्रे, प्रशिक्षण केंद्रे, प्रभागरचनेचे नकाशे क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करणे याबाबत आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत ३४३२ बूथद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडण्यात आली होती. यंदा महापालिकेत ३४ गावांचा समावेश झाला असून, महापालिका हद्दीतील मतदारांची संख्या ३४ लाख इतकी झाली आहे. या मतदारसंख्येसाठी सुमारे चार हजार मतदान केंद्रांची (बूथ) आवश्यकता भासणार आहे. सुरक्षित मतदान केंद्रे, पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील यंत्रणा नव्याने विकसित करावी लागणार असल्याने या ठिकाणी सर्वाधिक भर देण्यात आला आहे.
आरक्षणाच्या सोडतीची तयारी
राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश कधीही देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोडतीची तारीख निश्चित झाल्यास ही आरक्षणे कशी काढावीत, त्यासाठीची प्रक्रिया कशी असेल, सोडतीचा हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार असल्याने त्या ठिकाणची तयारी, याचाही आढावा घेण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणुका या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाल्या, तरी आरक्षणाची सोडतीचा कार्यक्रम लवकरच पार पडेल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे.
मतदारयाद्या फोडणे
आयोगाकडून दर वर्षी एक जानेवारी रोजी मतदारयाद्या अंतिम करण्यात येतात. यंदा या याद्या पाच जानेवारी रोजी अंतिम करण्यात आल्या आहेत. या मतदारयाद्या अंतिम झालेल्या प्रभागरचनेनुसार फोडण्यात येणार आहे. प्रभागनिहाय बूथ संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची मदत घेण्यात येते. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या रचनेनुसार क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य निरीक्षक आणि इंजिनीअर्स प्रत्यक्ष पाहणी करून मतदान बूथची भौगोलिक सीमा निश्चित करतात. त्या-त्या बूथमध्ये येणारे मतदार त्याच भागातील आहेत ना, याची खात्री करतात. गरज पडली, तर स्थानिक ‘बीएलओं’ची मदत घेण्यात येते. या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
‘महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या सात मुद्द्यांच्या आधारे आढावा घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येणाऱ्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे,’ अशी माहिती महापालिकेचे निवडणूक शाखा प्रमुख यशवंत माने यांनी दिली आहे.
यंदा नव्याने काय?
– यंदा महापालिकेत ३४ गावांचा समावेश
– महापालिका हद्दीतील मतदारांची संख्या ३४ लाख
– मतदारसंख्येसाठी सुमारे चार हजार मतदान केंद्रांची (बूथ) आवश्यकता भासणार
– सुरक्षित मतदान केंद्रे, पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.