गोलंदाजांच्या क्रमवारीत जेम्स अँडरसन अग्रस्थानी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/south-africa-james-anderson.jpg)
दुबई – आयसीसी कसोटी विश्वक्रमवारीतील गोलंदाजांच्या मानांकन यादीत रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या भारतीय फिरकी गोलंदाजांनी अनुक्रमे तिसरे व पाचवे स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन या मानांकन यादीत अग्रस्थानी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला येत्या 1 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे.
जडेजाचे 866 गुण असून अश्विनचे 811 गुण झाले आहेत. अँडरसन 892 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटींच्या मालिकेत 9 बळी घेतले होते. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 0-2 असा पराभव झाल्यानंतरही केगिसो रबाडा आणि व्हर्नान फिलॅंडर हे दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज अनुक्रमे 882 आणि 826 गुणांसह दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिले आहेत.
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असून मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा सहाव्या क्रमांकावर आहे. जो रूट हा टॉप-10 मधील इंग्लंडचा एकमेव फलंदाज असून ऑस्ट्रेलियाचा निलंबित कर्णधार स्टीव्हन स्मिथ फलंदाजांच्या क्रमवारीत अद्यापही अग्रस्थानावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत जडेजा आणि अश्विन अनुक्रमे दुसऱ्या चौथ्या स्थानावर आहेत. तर इंग्लंडचे बेन स्टोक्स व मोईन अली सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहेत.