मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठा निर्णय; ३ मे रोजी…
![Big decision in MNS office bearers meeting; On May 3 ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Big-decision-in-MNS-office-bearers-meeting-On-May-3-....jpg)
मुंबई| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर या दौऱ्याची रूपरेषा आखण्यासाठी राज यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज, मंगळवारी विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत अयोध्या दौरा आणि १मे रोजी औरंगाबाद येथील सभेच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यात आले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तसंच, आता ३ मेसाठी मनसेनं आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ३ मे रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी राज्यात मनसे कार्यकर्ते पोलिसांची परवानगी घेऊन ठिकठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. तसंच, महाआरतीदेखील करणार आहेत. यावेळी राज ठाकरेंकडून महापूजेची सूचनाही देण्यात आली आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी आले होते. १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादच्या सभेसाठी सगळी तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अयोध्येच्या ५ जूनच्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. त्याचीही सगळी तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठीची सध्या चर्चा सुरु आहे. अयोध्या दौऱ्यासाठी ट्रेन उपलब्ध करून देण्यासाठी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहलं आहे.
तसंच, मशिदीवरील भोंग्यांबाबत ३ मे रोजीच्या मनसेच्या अल्टिमेटमवर सरकारच्या नियमावली आल्यानंतर आम्ही आमचा अजेंडा ठरवणार आहोत, अशी माहिती बाळासाहेब नांदगावकर यांनी दिली आहे.
भोंग्यांबाबत दोन दिवसांत निर्णय
मनसे नेते राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. भोंगे उतरवले नाही, तर त्या ठिकाणी हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली. येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील धोरण ठरविण्यात येईल. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यभरासाठी अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी दिली.