राफेल गैरव्यवहार प्रकरणात सरकारकडून दिशाभूल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/rafale-6.jpg)
कॉंग्रेसचा आरोप ; अन्टोनींनाच उतरवले मैदानात
राफेल विमानांच्या किंमती जाहीर करण्याची केली मागणी
नवी दिल्ली – राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणात सरकारने केलेला खुलासा चुकीचा आहे. भारताने फ्रांसशी सन 2008 साली केलेल्या करारामुळे राफेल विमानाची खरेदी किंमत जाहीर करण्यास सरकारला कोणतीही बाधा येत नाही असे कॉंगेसने म्हटले आहे.
या प्रकरणी सरकारकडून दिशाभुल करणारी माहिती दिली जात आहे असे माजी संरक्षण मंत्री ए. के ऍन्टोनी यांनी म्हटले आहे.
या विषयात आज कॉंग्रेसने माजी संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टनी यांनाच मैदानात उतरवले आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत आणि फ्रांस यांच्यात सन 2008 साली जो करार करण्यात आला आहे त्यात संरक्षणविषयक व्यवहाराचीगुप्तता पाळण्याचे ठरले आहे, त्यामुळे राफेल विमानांची खरेदी किंमत जाहीर करता येत नाही असे जे विधान संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे ते साफ चुकीचे आहे. ही विमाने नेमक्या किती किंमतीत घेतली याची माहिती सरकारला द्यावीच लागणार आहे.
या व्यवहारावर महालेखापाल आणि संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीकडून शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे त्यामुळे सरकार या व्यवहाराची किंमत लपवू शकत नाही. पंतप्रधान अणि संरक्षण मंत्री राफेल किंमतीबाबत दिशाभूल का करीत आहेत याचा खुलासा सरकारने केला पाहिजे अशी मागणी कॉंग्रसचे दुसरे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राफेल विक्री किंमत खुली करण्यास फ्रांसचा आक्षेप नाही असे फ्रांसच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांना सांगितले आहे. सरकारने राफेल कराराविषयी खोटी माहिती देऊन संसदेचा हक्कभंग केला आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीही केला आहे.