महागाईवर भोंगे लावण्याअगोदर BMC मधील भ्रष्टाचार सांगणारे भोंगे लावू का; नितेश राणे
![Before raising the alarm on inflation, should we sound the alarm about corruption in BMC; Nitesh Rane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Before-raising-the-alarm-on-inflation-should-we-sound-the-alarm-about-corruption-in-BMC-Nitesh-Rane.jpg)
मुंबई |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसा वाचावी, नाहीतर आम्ही उद्या मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा वाचू, असं आव्हान दिलेल्या अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर शिवसेना चांगलीच संतापली आहे. फक्त हनुमान चालिसा नाही तर गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची हनुमान चालीसा वाचू, असा पटलावर शिवसेनेने केला आहे. मात्र शिवसेनेचा हा पलटवार भाजप आमदार नितेश राणे यांना काही रुचलेला नाही. महागाईवर भोंगे लावण्याअगोदर BMC मधील भ्रष्टाचार सांगणारे भोंगे लावू का?, असा सवाल करत त्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.
महाराष्ट्रात सध्या भोंगेपुराण सुरु झालंय. मशिदीवरचे भोंगे हटविण्यास राज ठाकरेंनी रमजान ईदपर्यंतचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिलाय. शिवाय सरकारने जर पावलं उचलली नाहीत तर हनुमान चालिसा पठणाचे आदेशही मनसैनिकांना दिले आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसा वाचावी, नाहीतर आम्ही उद्या मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा वाचू, असं आव्हान अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. राणांच्या या आव्हानावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच भडकल्या. फक्त हनुमान चालिसा नाही तर गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची हनुमान चालीसा वाचू, असं त्या म्हणाल्या. पेडणेकरांच्या याच वक्तव्यावर नितेश राणे यांनी कोटी करत सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
महागाईवर भोंगे लावण्याअगोदर BMC मधील भ्रष्टाचार सांगणारे भोंगे मुंबईमध्ये चालू केले तर चालतील का?, असा सवाल करत पेंग्विन भ्रष्टाचारपासून सुरु करु, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. एकाच ट्विटमधून त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना डिवचलं आहे.
रवी राणा VS किशोरी पेडणेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसा वाचावी, नाहीतर आम्ही उद्या मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा वाचू, असं आव्हान दिलेल्या अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या. देशात महागाईचा आगडोंब उसळलाय, इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. अशा स्थितीत काही लोकांना फक्त राजकारण सुचतंय. त्यांनी फक्त मातोश्रीबाहेर येऊन दाखवावं, असं ओपन चॅलेंज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रवी राणा यांना दिलंय.
हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करावी. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही तर मी मातोश्रीच्या बाहेर बसून हनुमान चालिसाचं वाचन करणार असल्याचं रवी राणा म्हणाले. मुख्यमंत्री जर हनुमान चालिसा वाचत नसतील तर त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडलाय. त्यांना बाळासाहेबांची शिकवण स्मृतीत आणून देण्यासाठी आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणू, असं आव्हान रवी राणा यांनी शिवसेनेला दिलं आहे. राणा यांच्या आव्हानानंतर शिवसेना देखील चांगलीच खवळली आहे. धार्मिक तेढ पसरवून दंगल माजवायची आहे का? असा सवाल महापौर पेडणेकर यांनी रवी राणा यांना विचारला.