कामावर हजर राहायचं की नाही;गुणरत्न सदावर्तेंच्या अटकेनंतर एसटी कर्मचारी संभ्रमात
![Whether to attend work or not; ST employees confused after arrest of Gunaratna Sadavarten](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Whether-to-attend-work-or-not-ST-employees-confused-after-arrest-of-Gunaratna-Sadavarten.png)
औरंगाबाद | संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला आणि गुणरत्न सदावर्ते यांना झालेली अटक यामुळे संपावर गेलेले एसटी कर्मचारी कामावर हजर राहण्याबाबत संभ्रमात आहे. तर औरंगाबाद विभागातील ६० टक्के आतापर्यंत कामावर हजर झाले असून, अजूनही ४० टक्के कर्मचारी संपावर कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत औरंगाबादेत सुमारे १५० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निकाल देतांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत संपावरील कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी संप मागे घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. त्याच दरम्यान पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना अटक झाली. त्यामुळे आता कामावर हजर राहायचं की नाही असा संभ्रम संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. औरंगाबाद विभागातील एकूण २ हजार ६४४ कर्मचाऱ्यांपैकी १ हजार ५० कर्मचारी अजूनही कामावर परतलेले नाहीत.
विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशापूर्वी म्हणजचे ७ एप्रिलपर्यंत औरंगाबाद विभागात ५० टक्के कर्मचारी कामावर परतले होते. त्यानंतर न्यायालयाने २२ एप्रिलची मुदत देत कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिल्याने कर्मचारी रुजू होण्याचे सत्र सुरू झाले होते. पण त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर आता कर्मचारी संभ्रमात आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही एसटी कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.