राज्यात मोठे स्टिंग ऑपरेशन! गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या रॅकेटचा भांडाफोड
कोल्हापूर | पोलिस, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करुन बेकायदेशीर गर्भपात आणि लिंग निदान करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून दोघां डॉक्टरांसह तिघांना बेड्या ठोकल्या. रात्री नऊ वाजता सुरू झालेला हे स्टिंग ऑपरेशन पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संपले.
या ऑपरेशनमध्ये सहभागी असणाऱ्या पोलिस अधिकारी आणि डॉक्टरांनी माहिती दिली. पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात गर्भलिंग चाचणी आणि स्त्री भ्रूण हत्या होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या केंद्राचा छडा लावण्याचा आदेश आरोग्य विभागाला दिला. तसेच पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही या गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन सुरू केले.
या गुन्ह्यातील एजंट भरत पोवार याच्याशी टीमने संपर्क साधला. त्यानंतर पोलिस कर्मचारी रुपाली यादव या गर्भवती असून त्यांची कर्नाटकातून तपासणी केली असून त्यांचा गर्भपात करावयाचा आहे असे एजंट पवार याला सांगितले. एंजट पवार आणि त्याचा सहकारी दत्तात्रय शिंदे यांच्याशी चर्चा करुन यांनी गर्भपात करण्यासाठी रक्कम ठरवण्यात आली. दत्तात्रय शिंदे याने गर्भपात करण्यासाठी बोगस डॉक्टर हर्षल नाईक (वय ४२, (वय ४०, रा. प्रतिराज गार्डन फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर) यांच्याशी संपर्क साधल्यावर त्याने पेंशटला पडळ येथील क्लिनिकला घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिस कर्मचारी रुपाली यादव, डॉ. हर्षल वेदक, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रध्दा आमले, सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर बोगस डॉक्टरला संशय येऊ नये म्हणून रिक्षाने बुधवारी रात्री पडळ गावी गेल्या.
डॉ. वेदक, पोलिस अधिकारी आमले आणि गीता हासूरकर यांनी रुपालीचे नातेवाईक असल्याचे सांगितले. बोगस डॉक्टर नाईकला कर्नाटकातील रिपोर्ट दाखवले. तसेच गर्भपातासाठी लागणारी रक्कम दिली. त्यानंतर हर्षल नाईक याने करंजफेण येथील बोगस डॉक्टर उमेश लक्ष्मण पोवार (वय ४६, रा.करंजफेण ता. शाहूवाडी सध्या राहणार हरिओमनगर अंबाई टँक रंकाळा परिसर कोल्हापूर ) हा गर्भपात करतो असे सांगून त्याच्याशी संपर्क साधाला. दोघांची चर्चा झाल्यानंतर गर्भपात करण्यासाठी औषधाच्या गोळ्या ठेवाव्या लागतील नाईक याने सांगितले. बोगस डॉक्टर उमेश पोवार याने गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या घेण्यासाठी त्यांना रंकाळा परिसरात बोलावले. त्यानंतर स्टिंग ऑपरेशनची टीम मध्यरात्री साडेबारा वाजता पडळहून कोल्हापूरला जाण्यास निघाली.
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास टीम कोल्हापूरात पोचली. बोगस डॉक्टर पोवार याच्याशी मोबाईलवर संपर्क साधल्यावर त्याने रंकाळा तलावाजवळील अंबाई टँक परिसरात येण्यास सांगितले. टीम अंबाई टँक परिसरात पोचल्यावर बोगस डॉक्टर पोवार तिथे पोचला. त्याने रुपाली यादव यांना काही प्रश्न विचारले. त्यानंतर गर्भाच्या पिशवीचे तोंड उघडण्यासाठी गोळ्या दिल्या. या गोळ्याची डॉ. वेदक यांनी खात्री केल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा आमले यांनी बोगस डॉक्टरला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या घरी जाऊन झडती घेतली. गर्भपात करण्यासाठी प्रशिक्षण घेतले नसतानाही पोवार याच्या घरी औषधे आणि किट मिळाली. त्यानंतर पोलिसांसह पथकाने पडळ येथील बोगस डॉक्टर नाईक याच्या क्लिनिकवर छापा टाकला. तिथेही पोलिसांना गर्भपात करणाऱ्या ग्राहकांची लिस्ट, फोन नंबर मिळाले. गोवा, कर्नाटकासह कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भपात करणाऱ्यांची नावे मिळाली. तर गर्भपात केल्यानंतर मुलगा कि मुलगी असा रिपोर्ट करणाऱ्या सांकेतीक भाषेतील चिठ्ठ्याही मिळाल्या. पोलिसांनी बोगस डॉक्टरसह तिघांना अटक केली असून गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. बुधवारी रात्री नऊला सुरू झालेले स्टिंग ऑपरेशन सकाळी सात वाजता संपले.