धक्कादायक! घरातील कुलरला स्पर्श करताच विजेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू

चंद्रपूर |
राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने घरांमध्ये कुलरचा वापरही वाढला आहे. मात्र, थंडावा निर्माण करणाऱ्या या कुलरमुळे एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना चंदपूर येथील मूल तेथे घडली. युग महेश जेंगठे असे या पाच वर्षीय बालकाचे नाव असून खेळताना त्याचा कुलरचा स्पर्श होवून विजेचा जोरदार धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
कुलरच्या स्पर्शाने विजेचा धक्का लागून मृत पावलेला यूग हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी महेश जेंगठे यांचा मुलगा. जेंगठे यांचे घर संत गजानन महाराज मंदिर परिसरात आहे. त्यांचा पाच वर्षीय मुलगा युग महेश जेंगठे नेहमी प्रमाणे आपल्या मोठ्या भावासोबत अंगणात खेळत होता.
खेळत असताना युगच्या हाताचा स्पर्श घरातील कुलरला झाला. त्याच वेळी युगला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याला तातडीने उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी युगला मृत घोषित केले. युग हा सेंट अॅन्स हायस्कूलचा विध्यार्थी होता. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने मागील महीन्याभरापासून तो घरीच राहत आहे. अशात आज ही दुदैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





