आधी खैरे म्हणाले आता दस्तुरखुद्द संजय राऊत म्हणतात.
![Earlier Khaire said that now Dastur himself is called Sanjay Raut.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Earlier-Khaire-said-that-now-Dastur-himself-is-called-Sanjay-Raut..jpg)
“मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असण्यानं…”
मुंबई | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेतृत्व तथा मुख्यमंत्री तसंच सेना नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते स्वत:कडे घ्यावे, असा सेना नेत्यांचा सूर आहे. औरंगाबादचे माजी खासदार, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी तशा प्रकारची मन की बात बोलून दाखवली. त्यांनी मीडियाला तशा प्रकारचा बाईट देऊन तासभरही होत नाही तोपर्यंतच महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांनीही खैरेंच्या सुरात सूर मिसळला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असाण्यानं राज्याला चांगली दिशा असते, असं संजय राऊत म्हणाले. त्याच्या या विधानाचे आता विविध राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला असताना तसंच फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतरही गृहमंत्री वळसे पाटील यांनी आक्रमक पद्धतीने पावलं न उचलता ‘आस्ते कदम’ भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहखाते आपल्याकडे घ्यावे, असा मतप्रवाह निर्माण झाला. त्याचाच परिपाक म्हणून औरंगाबादचे माजी सेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी उघड उघड भूमिका मांडली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही त्यांच्या खास स्टाईलमध्ये यावर आपली भूमिका मांडली आहे.
चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनीही खैरे यांच्या सुरात सूर मिसळला. “मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातं असावं, त्याच्यामुळे राज्य हाकण्याला एक दिशा मिळते, जे जरी खरं असलं तरी एका पक्षाचं सरकार असताना हे शक्य असतं. परंतु सध्या तीन पक्षांचं सरकार सत्तेत आहे. सरकार बनविताना ज्या पद्धतीने वाटाघाटी ठरल्या, त्याच पद्धतीने सरकार पुढे चालत आहे”, असं राऊत म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असावं, अशी आतापर्यंत एक परंपरा होती. पण पण एकपक्षीय सरकारमध्ये हे शक्य होतं. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहखातं होतं कारण त्यावेळी शिवसेनेपेक्षा भाजपकडे संख्याबळ अधिक होतं. हे तीन पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे प्रत्येकाला वाट्याला जी खाती आली त्यानुसार आम्ही पुढे गेलो. पण एक मात्र खरं तिन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास असल्याने हातात हात घालून काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे”, असं राऊत म्हणाले.