लोकपाल निवड समितीची 19 जुलैला होणार बैठक
नवी दिल्ली – लोकपाल नियुक्तीबाबत नेमण्यात आलेल्या समितीची येत्या 19 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली असून त्यात लोकपालपदावर नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तींची नावे निश्चीत करण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत चर्चा केली जाईल अशी माहिती सरकारतर्फे आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. त्यामुळे लोकपाल नियुक्ती विषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी आता 24 जुलै रोजी घेतली जाणर आहे. केंद्र सरकार लोकपाल नियुक्ती करण्यात चालढकल करीत असून त्यांना या विषयी स्पष्ट आदेश द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
तथापी सरकारने लोकपाल नियुक्त समितीची बैठक येत्या 19 जुलै ला बोलावली असल्याने त्यात काय निर्णय होतो ते तपासूनच पुढील आदेश देणे योग्य ठरेल असे नमूद करीत न्यायालयाने ही सुनावणी 24 तारखे पर्यंत पुढे ढकलली आहे. केंद्र सरकारने त्वरीत लोकपालांची नियुक्ती करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 27 एप्रिल रोजीच दिले आहेत. पण सरकारने त्यावर अजून हालचाल केलेली नाही त्यामुळे सरकारवर न्यायालयीन निर्णयाचा अवमान केल्याच्या कारणावरून कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेने केली असून प्रख्यात कायदे तज्ज्ञ शांती भुषण हे त्यांच्यावतीने ही केस लढत आहेत.