भोसरीत नवा ट्रान्सफॉर्मर ! 7,500 औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत
![भोसरीत नवा ट्रान्सफॉर्मर ! 7,500 औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/20_05_2021-electricity_supply_21661148_185523603.jpg)
भोसरी |
भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर महापारेषण कंपनीकडून केवळ चार दिवसांत बदलण्यात आला आहे. त्यामुळे भोसरी एमआयडीसी मधील 7,500 औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी (दि.27) सकाळी 7 वाजेपासून 12 ऐवजी 24 तासांसाठी पूर्ववत झाला आहे. अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
उर्वरित सर्व ग्राहकांना महावितरणकडून यापूर्वीच पर्यायी व्यवस्थेतून २४ तास वीजपुरवठा देण्यात येत आहे. महापारेषण कंपनीच्या भोसरी मधील अतिउच्च दाब 220 केव्ही उपकेंद्र मध्ये 1000 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये बुधवारी (दि.23) सकाळी 6 वाजता बिघाड झाला होता. त्यामुळे भोसरी व आकुर्डी परिसरातील महावितरणच्या सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता.
त्यातील 7,500 औद्योगिक ग्राहक वगळता उर्वरित सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने आठ वीजवाहिन्यांवरील 7,500 औद्योगिक ग्राहकांना नाईलाजाने चक्राकार पद्धतीने 12 तास वीजपुरवठा देण्यात येत होता. या ग्राहकांचा वीजपुरवठा देखील आता पूर्ववत करण्यात आला आहे. याआधीच्या नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मुळे विविध उपकेंद्रांमध्ये वळविण्यात आलेला वीजभार येत्या शुक्रवार (दि. 1 एप्रिल) पर्यंत टप्प्याटप्प्याने नव्याने कार्यान्वित झालेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून देण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.