पुतीन यांच्या बरोबरच्या बैठकीविषयी अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/trump-putin-.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हेलसिंकी येथे रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. पण या बैठकीत त्यांनी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने केलेल्या हस्तक्षेपाबद्धल अमेरिकन गुप्तहेर संघटनांनी जे निष्कर्ष काढले आहेत त्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी समर्थन न केल्याबद्दल अमेरिकेत त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे.
रशियन अध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी केलेले निवेदन हे अमेरिकेसाठी लाजीरवाणे ठरले आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. खुद्द ट्रम्प यांच्या समर्थकांपैकी काहींनी म्हटले आहे की या संयुक्तपत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी केलेले निवेदन ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी चूक आहे. तथापी खुद्द ट्रम्प यांनी मात्र आपल्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की रशियन अध्यक्षांबरोबर शांततेसाठी राजकीय धोका पत्करणे मी पसंत केले. दोन्ही देशांमध्ये झालेली ही चर्चा केवळ रशिया किंवा अमेरिकेच्या हिताचीच नाही तर ती साऱ्या जगाच्याही हिताची आहे. रशियन यंत्रणांनी अमेरिकेच्या सन 2016 च्या निवडणुकीत हस्तक्षेप केला हे ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेत ठामपणे सांगण्याचे टाळले होते. त्याविषयी स्पष्टीकरण देताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की रशियाच्या कोणत्याही यंत्रणेने अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणूकीत हस्तक्षेप केल्याच्या आरोपाचा खुद्द पुतीन यांनीही इन्कार केला आहे. त्यामुळे मला तो विषयी पुन्हा उपस्थित करणे प्रशस्त वाटले नाही.