भारताची विजयमालिका अखेर इंग्लंडने रोखली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/KOHLI-17.jpg)
लीड्स – जो रूटच्या शानदार नाबाद शतक आणि कर्णधार इयान मॉर्गनच्या साथीत त्याने केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय कसोटी सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव केला.
या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांची वन डे मलिका 2-1 अशी जिंकली. तसेच सलग दहा वन डे जिंकणाऱ्या भारताचा विजयरथ या पराभवामुळे रोखला गेला.
नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 256 धावांची मजल मारली. इंग्लंडने 44.3 षटकांत 2 बाद 260 धावा फटकावून एकतर्फी विजय मिळविला.
विजयासाठी 257 धावांच्या आव्हानासमोर जेम्स व्हिन्से (27) व जेम्स बेअरस्टो (30) परतल्यावर इंग्लंडच्या 2 बाद 74 धावा झाल्या होत्या. परंतु जो रूटने 20 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 100 धावा करताना मॉर्गनसह 35.2 शतकात 186 धावांची अखंडित भागीदारी करीत इंग्लंडला विजयी केले. मॉर्गनने 108 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह नाबाद 88 धावांची खेळी केली.
त्याआधी रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 12 षटकांत 71 धावांची दमदार भागीदारी करीत भारतीय संघाला पायाभरणी करून दिली. परंतु कोहलीच्या चुकीमुळे शिखर धवन धावबाद झाल्याने ही जोडी फुटली आणि तेथूनच भारतीय संघाचा डाव घसरला. धवनने 49 चेंडूंत 7 चौकारांसह 44 धावा केल्या.
विराटने मग दिनेश कार्तिकच्या (21) साथीत तिसऱ्या विकेटसाठी 6.4 षटकांत 41 धावांची आणि धोनीच्या साथीत 5.5 षटकांत 31 धावांची भर घातली. परंतु आदिल रशीदने कार्तिक, कोहली व रैना (1) यांना बाद करीत भारताची 5 बाद 158 अशी घसरगुंडी घडवून आणली. कोहलीने 72 चेंडूंत 8 चौकारांसह 71 धावा केल्या.
धोनीने 66 चेंडूंत 4 चौकारांसह 42 धावा करताना हार्दिक पांड्यासह 36 धावांची, तर भुवनेश्ववरसह 27 धावांची भर घातली. तरीही धोनी परतला तेव्हा भारताची 46 षटकांत 7 बाद 221 अशी अवस्था झाली होती. अशा वेळी भुवनेश्ववर (21) व शार्दूल ठाकूर (नाबाद 22) यांनी 24 चेंडूंत 35 धावांची भर घालताना भारताला 256धावांपर्यंत नेले.