अकरावीत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी
- दोन हजार विद्यार्थी 57 महाविद्यालयांमध्ये घेऊ शकणार प्रवेश
पुणे – इयत्ता अकरावीतील जे विद्यार्थी भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांकांमध्ये येतात त्या सर्व विद्यार्थ्यांना थेट प्रवेश घेण्याची संधी निर्माण झाली आहे. न्यायालयाने अल्पसंख्यांकाच्या जागा परत करण्याचा आदेश दिल्यानंतर आता विद्यार्थ्यांना जवळपास दोन हजार जागा आता उपलब्ध झाल्या आहेत.
अनेक नामांकित अल्पसंख्यांक महाविद्यालयांनी यापूर्वी आपल्या जागा या नियमित प्रवेश प्रक्रियेत समर्पित केल्या होत्या. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवडमधील 57 अल्पसंख्यांक महाविद्यालये होती. या महाविद्यालयांमध्ये एकूण 18 हजार 975 जागा होत्या. त्यापैकी अल्पसंख्यांकासाठी 9 हजार 488 जागा उपलब्ध होत्या. त्या जागांवर काही नियमित तर काही अल्पसंख्यांक असे मिळून एकूण 4 हजार 401 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित 2 हजार 43 जागा या त्या त्या महाविद्यालयांना परत करण्यात आल्या आहेत. आता याच जागांवर विद्यार्थी त्या त्या महाविद्यालयात जाऊन प्रवेशासाठी अर्ज करु शकणार आहेत. ज्या महाविद्यालयांत उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज येतील ती ती महाविद्यालये आपापल्या पातळीवर गुणवत्ता यादी जाहीर करुन प्रवेश देतील. हे प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेत अपडेट करण्यात येतील, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रभारी अध्यक्षा मिनाक्षी राऊत यांनी दिली.