ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मोहननगर येथील जलतरण तलाव तत्काळ सुरू करा – मीनल यादव
पिंपरी चिंचवड | मागील दोन ते अडीच वर्षांपासून बंद असलेल्या मोहननगर येथील जलतरण तलावाची डागडुजी करावी. उन्हाळा सुरु असल्याने हा तलाव तत्काळ सुरू करावा, अशी मागणी माजी नगरसेविका मीनल यादव यांनी केली.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात माजी नगरसेविका मीनल यादव यांनी म्हटले आहे की, मागील दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे मोहननगर येथील जलतरण तलाव बंद आहे. आता कोरोनाचे संकट कमी झाले आहे. उन्हाळा सुरु झाला आहे.
पुढील महिन्यात शाळेतील मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. मुलांना पोहोण्याचा आनंद घेता आला पाहिजे. वाढत्या उन्हाळ्यामुळे नागरिकांकडून हा तलाव सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या तलावाची डागडुजी करून हा तलाव तत्काळ सुरू करण्यात यावा, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.