दृष्टिहीन बांधवांसोबत पोलीस आयुक्तांनी साजरी केली होळी
![The Commissioner of Police celebrated Holi with the blind brothers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/pjimage-2022-03-18T185538.050.jpg)
पिंपरी चिंचवड | डोळ्यात दाटलेल्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तींना बरोबर घेऊन रंगांची उधळण करणारा धूलिवंदनाचा सण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आनंदात साजरा केला. ‘दृष्टिहीन व्यक्तीकडे दृष्टी नाही मात्र दूरदृष्टी आहे. रंगांची ओळख नसली तरीही या व्यक्ती आयुष्यात सप्तरंग भरत असतात, असे मत व्यक्त करत त्यांनी दृष्टिहीन बांधवांना रंग लावून होळीचा सण साजरा केला.
चिंचवड मधील पोलीस आयुक्त कार्यालयात आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आस्था हँडीक्राफ्ट्स मधील दृष्टिहीन बांधव या वेळी उपस्थित होते. कृष्ण प्रकाश यांनी रंगांची ओळख देत सर्व दृष्टिहीन व्यक्तिच्या चेहऱ्यावर रंग लावले. यामुळे भावुक झालेल्या दृष्टिहीन व्यक्तीनी आयुक्तांना रंग लावत शुभेच्छा दिल्या. डोळ्यांची काळजी घेण्याबाबत पर्यावरण पुरक होळी खेळण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
दृष्टी नसणे ही मोठी खंत आहे. मात्र आयुष्यात दुरदृष्टी ठेऊन यशस्वी व आनंदित राहता येते हे उदाहरण आज समोर असल्याचे, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले. दृष्टिहीन असलेल्या संदीप भालेराव, अशोक जाधव, तृप्ती भालेराव, गोरख घनवट यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेल्या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आस्था हँडीक्राफ्ट्स चे अध्यक्ष पराग कुंकुलोळ यांनी केले.सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी आभार मानले.