सोलापूरजवळ दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/murder-by-rod.jpg)
सोलापूर |
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर सोलापूरपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरामणी गावच्या शिवारात सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी दोन घरांवर दरोडे टाकून लूटमार केली. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. बाबू कल्लप्पा हिरजे (वय ६५) असे दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर शरणप्पा पाटील हे दरोडेखोरांच्या चाकूहल्ल्यात जखमी झाले. मध्यरात्रीनंतर गावशिवार झोपेत असताना सहा ते सात सशस्त्र दरोडेखोर आले. बाबू हिरजे व त्यांच्या पत्नी आपल्या घरात झोपले असताना दरोडेखोरांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी झोपेतून जागे झालेल्या हिरजे दाम्पत्याला दरोडेखोरांनी चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखविला.
पत्नीच्या गळय़ातील व कानातील दीड तोळे सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्यानंतर दरोडेखोरांनी पुन्हा दहशत निर्माण केली. परंतु त्या वेळी धाडस दाखवून बाबू हिरजे यांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्रहार केले. यात डोक्यात वार होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर दरोडेखोरांनी जवळच असलेल्या शरणप्पा पाटील यांच्या घराकडे मोर्चा वळविला. पाटील यांच्यावर दरोडेखोरांनी चाकूने वार केला. परंतु पाटील कुटुंबीयांनी जोरात आरडाओरड केल्यामुळे गाव जागा होण्याच्या भीतीने दरोडेखोरांनी तेथून पलायन केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी बोरामणी गावच्या शिवारात घटनास्थळी भेट देऊन दरोडय़ाच्या पद्धतीचे निरीक्षण केले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. बोरामणी गावात सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंकीत दूरक्षेत्र कार्यरत आहे. तेथे अहोरात्र पोलीस असतात. शिवाय सोलापूर-हैदराबाद महामार्गावर रात्रंदिवस वाहतुकीची वर्दळ असते.