चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लेवांडोवस्कीची हॅट्ट्रिक; बायर्न उपांत्यपूर्व फेरीत
तारांकित आक्रमणपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीने ११ मिनिटांच्या अंतरात साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीत त्यांनी साल्सबर्गचा ७-१ असा धुव्वा उडवला.
उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात बायर्नने साल्सबर्गला १-१ असे बरोबरीत रोखले होते. मंगळवारी मात्र बायर्नने घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना वर्चस्व गाजवले. लेवांडोवस्कीने अनुक्रमे १७, २१ आणि २३व्या मिनिटाला गोल नोंदवले. थॉमस म्युलर (५४ आणि ८३वे मिनिट), सर्ज गनाब्री (३१वे मि.) आणि लेरॉय साने (८५वे मि.) यांनी लेवांडोवस्कीला उत्तम साथ दिली.
लिव्हरपूल : लिव्हरपूलच्या मंगळवारी मध्यरात्री झालेल्या उपउपांत्यपूर्व लढतीत इंटर मिलानने १-० असे पराभूत केले; परंतु २-१ अशा एकूण गोलफरकाच्या बळावर लिव्हरपूलने उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या टप्प्यातील लढतीत लिव्हरपूलने मोहम्मद सलाह आणि रॉबटरे फर्मिनोच्या गोलमुळे २-० असा विजय मिळवला होता. लिव्हरपूलने गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा अंतिम आठ संघांत स्थान मिळवले.