अर्थसंकल्पाच्या उपसूचनेद्वारे टक्केवारी लाटण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघड – योगेश बहल
![Yogesh Behl exposes ruling party's ploy to cheat percentages through budget sub-instructions](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/yogesh-bahal.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपाचे एकामागोमाग एक अनेक भ्रष्टाचार बाहेर येत असतानाच या सत्ताधाऱ्यांनी सन 2022 – 23 च्या अंदाजपत्रकामध्ये उचसूचनेद्वारे मागील दाराने तब्बल 885 कोटी 66 लाख रुपयांच्या कामांची उपसूचनेद्वारे हेराफेरी केली आहे. केवळ आपल्या हस्तकांच्या माध्यमातून ही कामे करणे तसेच त्यातून कोट्यवधींची टक्केवारी कमाविणे असा हेतू असून त्याद्वारे जनतेच्या पैशांचा दुरुपयोग करण्याचा डाव उघड झाल्याने भाजपचा पुन्हा एकदा भ्रष्ट चेहरा उघड झाला आहे. आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या उपसूचना न स्वीकारता मुळ अंदाजपत्रक लागू करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी केली आहे.
याबाबत बहल यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, महापालिकेचे सन 2022-23 या आर्थिक वर्षांचे मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 497 कोटी 2 लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासनाने 18 फेब्रुवारी 2022 रोजी स्थायी समितीला सादर केले. त्यानंतर स्थायी समितीने 23 फेब्रुवारी 2022 रोजी तब्बल 885 कोटी 66 लाख रुपयांच्या उपसूचना दिल्या आहेत. शहरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व गरजेच्या कामांचा पैसा काही ठराविक कामांसाठी तसेच आपल्या समर्थक नगरसेवकांच्या प्रभागात वळविण्याचा त्यातून डाव आखला आहे. गेल्या पाच वर्षांपासून भाजपचा हा मनमानी कारभार सुरू आहे. सभाशाखेचे कोणतेही नियम न पाळता आतापर्यंत अवघ्या काही मिनिटांमध्ये अंदाजपत्रक मंजूर करण्याचा प्रकार या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. महापालिकेकडे जमा होणारा प्रत्येक रुपया हा जनतेकडून कररुपाने गोळा होता. त्या पैशांवर जनतेचा हक्क आहे. मात्र, नागरिकांच्या पैशांचा सातत्याने दुरुपयोग करून सत्ताधाऱ्यांकडून या पैशांवर राजरोसपणे डल्ला मारला जात आहे. अंदाजपत्रकाशी शहरातील प्रत्येक नागरीक जोडला गेलेला असतो, त्यांच्याशी संबंधित कामे केली जातात. अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करताना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.