कोल्हापूरच्या जोतिबा देवाच्या अश्वाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
![Kolhapur's Jyotiba Deva's horse dies of heart attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Horse.jpeg)
कोल्हापूर | जोतिबा डोंगरावरील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या उन्मेष नावाच्या अश्वाचे काल बुधवारी दुपारी अशक्तपणामुळे उपचार सुरू असताना निधन झाले. सकाळपासून या अश्वाला थकवा, अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक म्हेतर यांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवून तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र, दुपारी चारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने या अश्वाचे निधन झाले.
उन्मेष या नाथांच्या अश्वाला हिम्मत बहादूर चव्हाण सरकार यांच्याकडून २०१२ साली देण्यात आले होते. त्यावेळी साधारण नऊ महिन्याचा हा अश्व होता. आजअखेर या अश्वाने दहा वर्षे नाथांच्या सेवेत घालवले होते. अश्वाच्या निधनाचे वृत्त समजताच डोंगर परिसरातील भाविक व नाथभक्तांनी डोंगरावर धाव घेतली. नाथांच्या अश्वाच्या अंतिम दर्शनासाठी जनसमुदाय लोटला होता. दक्षिण दरवाजा या ठिकाणी या अश्वाचे अंत्यविधी करण्यात आले. यावेळी केदार्लिंग देवस्थान समितीचे कर्मचारी, पुजारी, गावकर प्रतिनिधी, ग्रामस्थ, भक्त उपस्थित होते.