मावळात माळीण पुनरावृत्तीचा धोका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/llasa231sa_201807105276.jpg)
पिंपरी – मावळातील निसर्गरम्य टेकड्या व डोंगराची बेकायदा लचकेतोड सुरू आहे. डोंगर उताराला राजरोसपणे अनधिकृत खोदाई होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे मोरमारवाडी, डोंगरवाडी, सटवाईवाडी व हेमाडेवस्ती गावात माळीणची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे.
आंदर मावळातील मोरमारवाडी गावात काही वर्षांपूर्वी जोरदार पाऊस झाल्याने हलकी दरड कोसळली होती. याच डोंगर भागात आता उतारावरील जमिनीला भेगादेखील पडल्या आहेत. परंतु ही नैसर्गिक आपत्ती असल्याने प्रशासनाने नागरिकांना सूचना देऊन केवळ सावध राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यावर कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच, या ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत टेकड्यांची लचकेतोडही थांबविलेली नाही.
जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माळीण गावावर डोंगर कोसळण्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांतील धोकादायक गावांची पाहणी केली होती. मात्र, सर्वेक्षणानंतर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या आंदर मावळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत प्रत्येक गावात रस्ते उभारण्याचे काम सुरू आहे. डोंगर उतारावरील मोरमारवाडी, डोंगरवाडी, सटवाईवाडी, हेमाडेवस्ती या भागातही रस्त्याची कामे सुरू आहेत.
मोरमारवाडीतून डोंगरवाडीत जाण्यासाठी संपूर्ण डोंगर पोखरून रस्ता तयार करण्यात आला आहे. सुमारे ४ कोटी ७५ लाख रुपये खर्च करून हा रस्ता बनवण्यात येत आहे. परंतु हा रस्ता बनवताना डोंगरावरील मोठे दगड फोडून रस्ते तयार केले जात आहेत. मात्र, या ठिकाणी तयार होणारा राडारोडा येथेच पडून आहे. आता हाच राडारोडा व दगड पावसाची सुरुवात होताच घसरून खाली गावात येऊ लागले आहेत. खोदलेल्या मातीच्या ढिगाºयातून डोंगरावरील जमिनीला भेगा पडून पाणी झिरपून माती खचू लागल्याने माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्तकरीत आहेत.
डोंगरउतारावर करण्यात येत असलेल्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. पावसामुळे झाडेदेखील उन्मळून पडल्याने रस्ता बंद झाला आहे. रस्ता बनवण्यासाठी डोंगर फोडल्याने माती आणि दगड सैल झाले. त्यामुळे प्रशासनाने मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता त्वरित हा दगडाचा राडारोडा हटवावा अशी मागणी होत आहे.