शिवजयंतीदिनी मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी – काँग्रेस
![Modi should apologize to Maharashtra on Shiv Jayanti - Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/modi-congress.jpg)
महाराष्ट्रातील काँग्रेसने देशभर करोना साथरोग पसरवला, असा आरोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी ( १९ फेब्रुवारी) महाराष्ट्राची माफी मागून प्रायश्चित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. त्यासाठी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवतील, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल पंतप्रधान मोदी व भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, यासाठी काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून मुंबई व इतर काही जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. हे आंदोलन चालूच राहील, परंतु त्याचबरोबर या आंदोलनाचाच पुढचा टप्पा म्हणून मोदी यांनी माफी मागावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिल्लीचे तख्त आणि अहंकारी इंग्रजांसमोर झुकला नाही, याचा इतिहास साक्षी आहे. तुमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा की शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागावी लागली, तशी महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल माफी मागणे चांगले राहिल. दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्षमा मागून तुमच्या पापाचे प्रायश्चित करा.’’ अशा आशयाची पत्रे फडणवीस यांना पाठिवण्यात येणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली .