गतविजेत्या बांगलादेशला पराभूत करत भारत सेमीफायनलमध्ये, २०२० चा ‘तो’ बदलाही घेतला
![india-take-revenge-in-2020-semifinals-defeating-defending-champions-bangladesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/IND-vs-BAN-U19-WC.jpg)
भारताने वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप (ICC Under 19 World Cup 2022) स्पर्धेत गतविजेत्या बांगलादेशला पराभूत केलंय. तसेच उपांत्य फेरीत (सेमी फायनल) आपली जागा निश्चित केली. विशेष म्हणजे भारताने या विजयासह बांगलादेशसोबतचा बदलाही पूर्ण केला. याच बांगलादेशने २०२० मध्ये भारताला अंतिम फेरीत नमवून जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता उपांत्य फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.या सामन्यात भारताचा कर्णधार यश धुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाचा मान राखत बांगलादेशला ३७.१ षटकात १११ धावांवर ऑलआऊट केले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी ३१ व्या षटकातच ५ विकेटने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली आणि सामना खिशात टाकला.
महफिझुल इस्लाम आणि इफ्तेखार हुसेन यांनी बांगलादेशच्या डावाची सुरुवात केली. पण सांघिक तिसऱ्या धावावर बांगलादेशला पहिला धक्का बसला. रवी कुमारने महफिझुलचा (२) त्रिफळा उडवला. त्यानंतर रवीनेच दुसरा सलामीवीर इफ्तेखार हुसेन (१) आणि त्यानंतर आलेल्या प्रांतिक नवरोजला (७) बाद करत बांगलादेशची अवस्था खिळखिळी केली. संघाच्या ५६ धावा फलकावर असताना बांगलादेशने ७ फलंदाज गमावले. त्यानंतर एसएम महरोबने ३० धावांची खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ लाभली नाही. अखेर राजवर्धन हंगरगेकरने तंजीम हसन साकिबला झेलबाद करत बांगलादेशचा डाव १११ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून रवी कुमारने १४ धावांत ३, विकी ओसवालने २५ धावांत २ बळी घेतले.