पुलवामा चकमकीत पाकिस्तानी अतिरेक्यासह ३ अतिरेकी ठार
![Three militants, including a Pakistani militant, were killed in a clash in Pulwama](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/terrorists-jk.jpg)
श्रीनगर | टीम ऑनलाइन
जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील चांदगाममध्ये आज पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यात जोरदार चकमक झाली. त्यात एका पाकिस्तानी अतिरेक्यासह ३ अतिरेकी ठार झाले. सुरक्षा दलाला आलेले हे मोठे यश आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदच्याही अतिरेक्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी कारवाया मोडून काढण्यासाठी लष्कराचे जवान, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. त्यात आज सकाळी पुलवामा जिल्ह्याच्या चांदगाममध्ये काही अतिरेकी दडून बसले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलाच्या जवानांना दिली होती. त्यानुसार त्यांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी एका घरात दडून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या घराला वेढा घालून कारवाई केली. तिथे अनेक तास जोरदार गोळीबार झाला. त्यात ३ अतिरेकी ठार झाले. चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांमध्ये एका पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश आहे. त्याच्याकडून एके ५६ रायफली, हातबॉम्ब आणि काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरिक्यांमध्ये जैश-मोहम्मदच्या अतिरेक्यांचाही समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.