बुराडी सामूहिक मृत्यू प्रकरण: ललित भाटिया बघायाचा हॉरर टीव्ही शो!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Lalit-bhatiya.jpg)
बुराडी येथील एकाच कुटुंबातील ११ सदस्यांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने सगळा देश हादरला. या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात ज्याने पुढाकार घेतला होता त्याचे नाव ललित भाटिया होते आणि तो हॉरर शो पाहात असल्याचे समोर आले आहे. भाटिया कुटुंबीयांनी आपले आयुष्य का संपवले याचा शोध पोलीस घेत आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही माहिती समोर आणली आहे. ललित भाटियाला हॉरर टीव्ही शो आणि हॉरर सिनेमा बघण्याचा छंद होता. भुताखेतांशी संबंधित अनेक गोष्टी त्याने त्याच्या मोबाईलवरील इंटरनेटमध्ये सर्च केल्या होत्या असेही त्याचा मोबाइल तपासल्यावर समजले आहे. एवढेच नाही तर ललित भाटिया अनेकदा स्मशानातही जाऊन आला होता, अशीही माहिती समोर आली आहे.
ललित भाटिया अनेकदा यू ट्युबवरही पॅरानॉर्मल आणि हॉरर शो बघत असे. ललित भाटिया त्याच्या मृत वडिलांशी बोलत असे अशी माहिती यापूर्वीच समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बुराडीमध्ये एकाच घरातील ११ जणांचे मृतदेह आढळले होते. या ११ पैकी १० मृतदेह एका लोखंडी जाळीला अडकलेले होते. तर एका वृद्ध महिलेचा मृतदेह फरशीवर पडलेल्या अवस्थेत सापडला होता. या सगळ्यांच्या डोळ्यावर आणि तोंडावर पट्टी बांधलेली होती. तर हात मागे बांधलेल्या स्थितीत होते.
ललित भाटिया प्लायवुडचा व्यवसाय करायचा आणि एकदा त्याच्या अंगावर लाकडाचा एक गठ्ठा पडला होता. त्यानंतर त्याची वाचा गेली होती. त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. मग भाटिया परिवाराने ललितची वाचा परतावी म्हणून पूजापाठ करणे सुरु केले. त्यानंतर काही दिवसांनी ललितची वाचा परत आली त्याला बोलता येऊ लागले. ललितला बोलता येऊ लागल्यानंतर सगळे कुटुंब अध्यात्माकडे वळले, अशी माहिती भाटिया कुटुंबीयांचा निकटवर्तीय हेमंत शर्माने दिली आहे. भाटिया कुटुंबीयांबद्दल दररोज नवी काहीतरी माहिती समोर येते आहे. अशात सगळ्या कुटुंबाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारा ललित भाटिया हा हॉरर शो बघायचा, त्याला त्याची आवड होती हे देखील समोर आले आहे.