ओमायक्रॉन बाधितांपैकी ५० टक्के रुग्ण लसीचे दोन्ही डोस घेतलेले; मास्क आणि नियमांचे पालन करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
![ओमायक्रॉन बाधितांपैकी ५० टक्के रुग्ण लसीचे दोन्ही डोस घेतलेले; मास्क आणि नियमांचे पालन करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/914328-corona-vaccine.jpg)
नवी दिल्ली |
ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे देशात संक्रमणाची तिसरी लाट येण्याची भीती असताना सरकारने १८३ रुग्णांचे विश्लेषण केल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ५० टक्के म्हणजे ८७ रुग्णांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातील तीन जणांनी बूस्टर डोसही घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या विश्लेषणावरून ओमायक्रॉनला थांबवण्यासाठी केवळ लस पुरेशी नाही. संसर्गाची साखळी थांबवण्यासाठी मास्क आणि करोना नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तज्ञांनी स्पष्ट केले आहे की ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात स्वच्छ ठेवणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
शुक्रवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशात आढळलेल्या १८३ करोना बाधितांचे विश्लेषण समोर आणले. यापैकी ९६ रुग्ण असे आहेत, ज्यांचे लसीकरण झाले आहे. यापैकी, ८७ रुग्णांना (१० पैकी ९ म्हणजे ९१ टक्के) लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. यापैकी तीन जणांना आधीच बुस्टर डोस मिळालेला आहे. दोघांचे अंशतः लसीकरण झालेले आहेत आणि सात लसीकरण झालेले नाहीत. ७३ संक्रमित रुग्णांची लसीकरणाच्या स्थितीबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तर १६ पात्र नाहीत. १८ रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास माहीत नाही. इतर १६५ रुग्णांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की १२१ म्हणजे ७३ टक्के लोकांनी परदेशात प्रवास केला आहे. महत्त्वाचे म्हणजे २७ टक्के लोकांचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, ७० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
“ओमायक्रॉन संसर्गामुळे गंभीर लक्षणे उद्भवतातच असे नाही. देशात आतापर्यंत आढळलेल्या एक तृतीयांश प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत, तर इतरांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. म्हणूनच मी यावर जोर देऊ इच्छितो की लक्षणे असलेल्या रूग्णांवर त्याच प्रकारे उपचार केले जातील,” असे भार्गव म्हणाले. निती आयोगाचे (आरोग्य) चे सदस्य आणि कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल यांनी इशारा दिला आहे. डेल्टा पेक्षा ओमायक्रॉन प्रकारामुळे घरातील संसर्गाचा धोका जास्त आहे. घराबाहेर मास्क न घातल्यामुळे एखाद्या व्यक्तीने संसर्ग घरात आणला तर तो घरातील इतरांनाही संक्रमित करेल. ओमायक्रॉनमध्ये हा धोका जास्त आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असेही पॉल म्हणाले.